कुठलेच होणार नाहीत मोठे कार्यक्रम
वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरातमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना 2 ते 5 मेपर्यंत सुटी देण्यात आली आहे. भाजपच्या वरिष्ठ कार्यकर्त्यानुसार राज्यातील सुमारे 1 कोटी कार्यकर्ते यात सामील आहेत. पक्ष कार्यकर्ते कधीच सुटी घेऊ शकत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कार्यकर्त्यांना सुटी देण्यासह या तीन दिवसांमध्ये कुठलाच मोठा कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये असा आदेश देण्यात आला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागील दोन वर्षांमध्ये विश्रांती न घेता काम केले असल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याचे म्हटले गेले आहे.
पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकाचवेळी सुटीवर जाण्यासंबंधी गुजरातमध्ये पहिल्यांदाच निर्णय घेण्यात आला आहे. पक्षानुसार भाजपमध्ये कधीच कुठल्याही कार्यकर्त्यावर कार्यक्रमात सामील होण्यासाठी दबाव टाकण्यात आलेला नाही.
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काही दिवसांपूर्वी गुजरातमधील भरूच येथे पोहोचले होते. तेव्हा त्यांनी सभेला संबोधित करताना सत्तारुढ भाजप लवकरच निवडणूक घेण्याच्या विचारात असल्याचे म्हटले होते. तर मुदतपूर्व निवडणूक न झाल्यास गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे.
निवडणूक आता होऊ दे किंवा 6 महिन्यांनी, देव आणि गुजरातचे लोक आमच्यासोबत आहेत. आम्ही निश्चितपणे आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन करू असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. भाजपला केवळ विजयाचा नव्हे तर 2017 च्या तुलनेत अत्यंत मोठय़ा विजयासह सत्ता राखण्याचा विश्वास आहे.