13 दिवसात 6 हजार चौकिमीचा भाग केला मुक्त ः युक्रेन अध्यक्षांचा दावा
वृत्तसंस्था / कीव्ह
24 सप्टेंबर रोजी रशिया-युक्रेन युद्धाला 7 महिने पूर्ण होणार आहेत. अशा स्थितीत युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी चालू महिन्यात आमच्या सैन्याने रशियाच्या कब्जातून 6 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग मुक्त करविला असल्याचा दावा केला आहे. तर यातील 3 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग मागील आठवडय़ात गुरुवार ते शनिवारदरम्यान मुक्त करविण्यात आल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे.
पूर्व युक्रेनमध्ये खारकीव्हनजीक भीषण लढाई सुरू आहे. तेथील अनेक भागांमधून रशियाच्या सैनिकांनी पळ काढला आहे. तर खेरसोनमध्येही युक्रेनचे सैन्य पुढे सरकण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनच्या सैन्याने देशाच्या पूर्व हिस्स्यात रशियाच्या सैन्याच्या रसदपुरवठा मार्गातील अत्यंत महत्त्वाच्या इजियम आणि कूपियांस्क या भागांवर नियंत्रण मिळविले आहे. तर या भागातून मागे हटलेल्या रशियाच्या सैन्याने स्वतःची शस्त्रास्त्रs अन् रणगाडे तसेच सोडून दिली आहेत.

रशियाकडून माघारीची कबुली
पूर्व युक्रेनमध्ये स्वतःच्या समर्थक गटांच्या कब्जातील भागात पुन्हा एकजूट होता यावे म्हणून आमचे सैन्य मागे हटल्याचा दावा रशियाने केला आहे. इजियम शहराच्या बाहेरील भागांमध्ये अद्याप संघर्ष सुरू आहे. डोनबास शहरानजीक गोळीबार सुरू आहे. खनिजसंपदेने भरपूर या भागात रशियाचे समर्थन प्राप्त असलेल्या फुटिरवाद्यांनी 2014 मध्ये बंड केले होते. रशियाच्या सैन्याने डोनेट्स्क आणि लुहान्स्क प्रांतावर लक्ष केंद्रीत केले आहे. रशियाने युक्रेनच्या पॉवरग्रिडवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याने देशातील मोठय़ा भागातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. रुग्णालये, नागरी इमारती काळोखात बुडाल्या आहेत. रशियाच्या 11 पैकी 9 क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट केल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
..तर रशियाचा मोठा पराभव
खारकीव्ह भागातील बालाक्लिया या शहरातूनही रशियाचे सैन्य मागे हटले आहे. डोनेट्स्कमधील आघाडी मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे रशियाचे म्हणणे आहे. तर तज्ञांनुसार युक्रेन सैन्याच्या प्रत्युत्तराला रशियाचे सैनिक तोंड देऊ शकले नाहीत. या शहरांवर युक्रेनने पुन्हा नियंत्रण मिळविल्याने रशियाला मोठा झटका बसला आहे. इजियमवर कब्जा करण्यासाठी रशियाने मोठा संघर्ष केला होता. कूपियांस्क, बालाक्लिया आणि इजियमधून रशियाच्या सैन्याच्या माघारीची पुष्टी झाल्यास दुसऱया महायुद्धानंतर कुठल्याही आघाडीवर त्याचा हा सर्वात मोठा पराभव ठरणार आहे. युक्रेन समर्थक सोशल मीडियावर अनेक चित्रफिती अन् छायाचित्रे पोस्ट करत आहेत. यात युक्रेनचे सैनिक नियंत्रणात आलेल्या भूभागांमध्ये देशाचा ध्वज फडकवत असल्याचे दिसून येते.









