कावरेपिर्लात मंत्री सुभाष फळदेसाई यांचा दबदबा कायम
वार्ताहर /केपे
केपे तालुक्मयातील कावरेपिर्ला पंचायतीतून 3 उमेदवार, तर बाळ्ळी पंचायतीतून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. एकूण 240 उमेदवार रिंगणात असून 39 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. केपे तालुक्मयात व सांगे मतदारसंघात समावेश असलेल्या कावरेपिर्ला पंचायतीतील सात प्रभागांपैकी तीन प्रभागांत बिनविरोध उमेदवार निवडून आणून सांगेचे आमदार व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी आपला दबादबा कायम राखला आहे.
कावरेपिर्ला पंचायतीच्या प्रभाग 4 मधून सत्यवान देविदास यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने दत्तेश गावकर हे बिनविरोध निवडून आले आहेत, तर प्रभाग 5 मधून रक्षदा राजेंद्र फळदेसाई यांनी माघार घेतल्याने माधुरी रमाकांत देविदास या बिनविरोध निवडून आल्या आहेत. प्रभाग 6 मध्ये एकमेव अर्ज आल्याने विधी वेळीप यांची यापूर्वीच बिनविरोध निवड निश्चित झाली होती. बाळ्ळी पंचायतीच्या प्रभाग 7 मध्येही एकमेव अर्ज आल्याने अंजू मालू वेळीप यांची बिनविरोध निवड आधीच पक्की झाली होती.
39 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 11 पंचायतींतून 240 उमेदवार रिगणात राहिले आहेत. यात असोल्डा पंचायतीत 18, शेल्डे 44, मळकर्णे 16, कावरेपिर्ला 9, आंबावली 18, बाळ्ळी 29, बार्से 24, फातर्पा 18, बेतूल 18, तर मोरपिर्ला पंचायतीत 17 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.









