आजच्या काळात स्वत:चे घर किंवा सदनिका खरेदी करणे किती कठीण आहे, याची सर्वांना कल्पना आहे. संपूर्ण आयुष्यभर काबाडकष्ट करुनही घर विकत घेण्याइतकी कमाई अनेकजण करु शकत नाहीत. अशा स्थितीत केवळ 270 रुपयांमध्ये तीन घरे विकत घेतली गेली, असे कोणी सांगितल्यास त्यावर विश्वास ठेवणे अशक्य आहे. तथापि, नेमका हाच प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका महिलेने इटली या देशात विकत घेतली आहेत.
इटलीत स्वस्त घरे मिळत आहेत, अशी माहिती रुबिया डॅनियल या महिलेला मिळाली. प्रारंभी या महितीवर त्यांचाही विश्वास बसलेला नव्हता. पण त्यांनी संशोधन केल्यानंतर ती खरी असल्याचे त्यांना समजले. त्वरित फ्लाईट बुक करुन त्या इटलीला गेल्या. तेथील मुसोमेली या शहराला त्यांनी भेट दिली. हे पूर्ण शहर ओस पडले आहे. येथील लोक रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेत असल्याने हे शहर पूर्ण रिकामे पडत चालले आहे. त्या या शहरात 10 दिवस राहिल्या.
याच काळात त्यांनी येथील तीन घरे निवडली. त्यांची किंमत अवघी सव्वातीन डॉलर इतकी ठरविण्यात आली. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत साधारणत: 270 रुपये होते. एवढ्या किमतीला त्यांनी ती विकत घेण्याचा करार करुन नंतर ती ताब्यातही घेतली. इटलीत आणि अन्य काही युरोपियन देशांमध्ये अशी स्वस्त घरे मिळत आहेत. त्यामुळे इतरही अनेक लोक त्यांची खरेदी करत आहेत. तेथील सरकारे आणि स्थानिक प्रशासनेही याकामी सहाय्य करीत आहेत. ओस पडलेली शहरे त्या निमित्ताने जागती होतींल अशी त्यांना अपेक्षा आहे. अशी स्वस्त घरे ज्यांनी घेतली आहेत, त्यांनी या ओसाड गावांमध्ये येऊन रहावे आणि ही गावे पुन्हा गजबजावीत या हेतूने इतक्या स्वस्त दरात घरे दिली जात आहेत.









