अंधारातही हल्ला करण्यास सक्षम : पाक सीमेवर होणार तैनात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेकडुन अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्सचा पुरवठा चालू आठवड्यातच होणार आहे. पहिल्या खेप अंतर्गत एकूण तीन अपाचे हेलिकॉप्टर्स मिळणार असून ती रात्रीच्या वेळी देखील लक्ष्याचा शोध घेणे आणि ते नष्ट करण्यास सक्षम आहेत. अमेरिकेच्या सैन्यात दीर्घकाळापासून तैनात या हेलिकॉप्टर्सना जगभरातून मोठी मागणी राहिली आहे. आतापर्यंत सुमारे 20 देशांना अमेरिकेकडून या हेलिकॉप्टर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. भारत या अपाचे हेलिकॉप्टर्सना पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तैनात करण्याच्या तयारीत आहे.
या हेलिकॉप्टर्सना ‘हवाई रणगाडा’ देखील म्हटले जाते. अमेरिकेतून येणारी एएच-64ई अपाचे हेलिकॉप्टर्सचे लँडिंग गाजियाबादच्या हिंडन वायुतळावर होणार आहे. भारतीय वायुदलाकडे याच्या दोन स्क्वाड्रन्स असून त्या पठाणकोट आणि जोरहाट येथील वायुतळावर सक्रीय आहेत. 2015 मध्ये भारत सरकारने 22 अपाचे हेलिकॉप्टर्ससाठी अमेरिकेसोबत करार केला होता. त्या ऑर्डरची पूर्तता अमेरिकेकडून जुलै 2020 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर 2020 मध्ये भारताने आणखी 6 हेलिकॉप्टर्स खरेदीसाठी करार केला होता. याच्या अंतर्गत पहिल्या खेपचा पुरवठा मे-जून 2024 दरम्यान होणे अपेक्षित होते. परंतु यात विलंब होत गेला. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय सैन्याच्या क्षमतेत भर पडणार आहे.
हैदराबाद येथे उत्पादन प्रकल्प
अमेरिकन कंपनी बोइंग आणि टाटा समुहाकडून एक संयुक्त उपक्रम हैदराबाद येथे निर्माण करण्यात आला आहे. येथे तयार करण्यात आलेले एक अपाचे हेलिकॉप्टर 2023 मध्ये भारतीय सैन्याला मिळाले होते. हे हेलिकॉप्टर कुठल्याही हवामानात अचूक डाटा प्राप्त करू शकते. या हेलिकॉप्टरमध्ये नाइट व्हिजन नेव्हिगेशन सिस्टीम असून याच्या माध्यमातून रात्रीच्या काळोखातही लक्ष्याचा शोध घेतला जाऊ शकतो. अपाचे हेलिकॉप्टर्सचा आक्रमणासह सुरक्षा आणि शांतता मोहिमेसाठी वापर केला जाऊ शकतो.









