‘सर आली धावून हळदीची शेती गेली वाहून’ असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली
मसूर : चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व मुसळधार व संततधार पावसामुळे कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथील हुंबरी नावाच्या शिवारातील सुमारे तीन एकर शेती हळद पिकासह वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान, सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे शेतीतील बांध फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे सर आली धावून हळद शेती गेली वाहून असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
मसूरसह परिसरात मुसळघार पाऊस सुरु आहे. या पावसाने वडोली भिकेश्वर येथील उत्तर बाजूस असणाऱ्या हुंबरी नावाच्या शिवारातील परिसरातील सुभाष नारायण साळुंखे यांची गट नंबर १७८ मधील २४ गुंठे शेती हळद पिकासह रेन पाईप व इतर पाईप वाहून गेल्याने त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. त्याच पद्धतीने लक्ष्मण भीमराव साळुंखे व विनोद दादासो शेडगे यांची शेतजमीन वाहून गेल्याने या ठिकाणी चर पडून मोठे नुकसान झाले.
बाबुराव पिलाजी शेडगे यांची गट नंबर १७४ मधील शेती वाहून गेलीये तर बाळासो यशवंत शेडगे या शेतकऱ्याची नऊ गुंठे शेती वाहून जाऊन दोन फुट शेतात चर निर्माण झाली. या पावसामुळे या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून असल्याने ठिकठिकाणी बांध फुटलेत.
पूर सदृश्य स्थितीमुळे दोडी धरणातही पाणी साचले. या पुरात धरणालगत असलेला रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने याठिकणच्या नागरिकांनी गैरसोय होत आहे. दरम्यान, दमदार झालेल्या पावसात परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समजताच तलाठी बाबर यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.
वीट भट्टी वाल्यांच्या निष्काळजीपणामुळे जमिनी वाहून गेल्या
वडोली भिकेश्वर परिसरात मसूर उंब्रज रस्त्याला अनेक वीट भट्टी आहेत. याठिकाणी असणाऱ्या वीट भट्टीवाल्यांनी नाला साफ न केल्यामुळे नाल्यातील पाणी उलटून त्यास प्रवाह व दाब निर्माण झाल्याने आमची शेती वाहून गेली असल्याचा आरोप यावेळी शेतकरी सुभाष साळुंखे यांनी केला.








