वृत्तसंस्था/अहमदाबाद
गुजरातमध्ये गुरुवार, 13 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपाचे केंद्र बनासकांठा जिह्याचे मुख्यालय पालनपूरपासून सुमारे 34 किमी अंतरावर होते. तथापि, यामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. यापूर्वी उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये बुधवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले होते. धरणी हादरल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.5 इतकी होती. उत्तराखंडमध्ये जाणवलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तरकाशीतील जसपूर आणि मांडो दरम्यानच्या जंगलात जमिनीच्या पृष्ठभागापासून 5 किमी खाली होता. तथापि, अद्याप कोणत्याही मोठ्या नुकसानीचे वृत्त आलेले नाही. उत्तरकाशी हा डोंगराळ भाग असल्याने, येथे यापूर्वीही भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. सध्या प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवणार असल्याचे म्हटले आहे.









