जुलैपासूनच लागू : सरकारचा आदेश , महागाई भत्ता पोहोचला 35 टक्क्यांवरून 38.75 टक्क्यांवर
प्रतिनिधी/ बेंगळूर
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्तावाढीच्या रुपाने दसरा भेट मिळाली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 3.75 टक्के वाढ करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 38.75 टक्क्यांवर पोहोचला आहे.
अलीकडेच राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सरकारकडे महागाई भत्ता वाढविण्याची विनंती केली होती. या विनंतीची सकारात्मक दखल घेण्यात आली आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांनाही 3.75 टक्के भत्तावाढीची खूशखबर दिली आहे. 2018 च्या सुधारित वेतन श्रेणीनुसार वेतन घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्तावाढ 1 जुलै 2023 पासून लागू होईल, अशा पद्धतीने जारी करण्यात आला आहे. यापूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 35 टक्के महागाई भत्ता मिळत होता. आता तो वाढविण्यात आल्याने 38.75 टक्क्यांवर पोहोचला आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी, कुटुंब निवृत्तीवेतन घेणारे आणि राज्य संचित निधीतून वेतन, निवृत्तीवेतन घेणाऱ्या अनुदानित शिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. जिल्हा पंचायत व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पूर्णवेळ काम करणारे कर्मचारी, तात्पुरत्या वेतनश्रेणीतील पूर्णवेळ कार्यभार असलेले कर्मचारी आणि युजीसी/एआयसीटीई/आयसीएआर वेतनश्रेणीतील अध्यापक कर्मचारी, एनआयपीसी वेतन श्रेणीतील न्यायालयीन अधिकाऱ्यांनाही भत्तावाढ लागू आहे.
बुधवार 18 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचा भत्ता 4 टक्क्यांनी वाढविला होता. त्यामुळे त्यांचा भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा लाभ 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना मिळणार आहे.
ग्रॅच्युइटीची थकबाकी ऑक्टोबर 2023 चे वेतन देण्यापूर्वी अदा करू नये. ग्रॅच्युइटी हा मोबदल्याचा एक विशिष्ट भाग म्हणून दर्शविला जातो. कोणत्याही हेतूसाठी ते वेतन म्हणून मानले जाऊ शकत नाही, असा उल्लेख आदेशपत्रकात करण्यात आला आहे.









