वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या एका अहवालामध्ये जून 2023 मध्ये देशात वापरकर्त्यांची संख्या 3 लाख 74 हजाराने वाढून 114.36 कोटी इतकी झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
जिओ आणि एअरटेल यांनी याबाबतीमध्ये ग्राहक जोडण्यामध्ये आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे बीएसएनएल आणि व्होडाफोन-आयडिया यांच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याची बाब समोर आली आहे. जून महिन्यामध्ये बीएसएनएलचे 18.70 लाख वापरकर्ते कमी झाले आहेत. यांच्या वापरकर्त्यांची संख्या घसरून 9.95 कोटी राहिली आहे. या आधीच्या मे महिन्यामध्ये बीएसएनएलने 14.9 लाख ग्राहक गमावले आहेत. व्होडाफोन-आयडिया ग्राहकांमध्येदेखील घसरण दिसून आली आहे. 12.5 लाख ग्राहक यांचे कमी झाले आहेत.
तर दुसरीकडे भारती एअरटेलने 14.09 लाख ग्राहक नव्याने जोडले आहेत. याआधीच्या मे महिन्यामध्ये कंपनीने 13.3 लाख ग्राहक जोडले होते. या माध्यमातून पाहता कंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या 37.37 कोटी इतकी राहिली आहे, रिलायन्सच्या जिओने जूनमध्ये 22.73 लाख नव्या वापरकर्त्यांची भर घातली आहे. त्यांची संख्या एकूण 43.86 कोटी झाली आहे.
मोबाइल ब्रॉडबँड- जिओ अव्वल
44.7 कोटी ग्राहकांसह जिओ ही देशातील सर्वात मोठी मोबाईल ब्रॉडबँड कंपनी ठरलेली आहे. 24.8 कोटी मोबाईल ब्रॉडबँड ग्राहकांसह भारती एअरटेल दुसऱ्या नंबरवर आहे तर व्होडाफोन आयडिया 12.4 कोटी ग्राहकांसह तिसऱ्या नंबरवर आहे.
टेलिकॉम क्षेत्रात जिओचा वाटा जूनमध्ये घटून 38 टक्के इतका राहिला आहे. जो आधी 51 टक्के इतका होता. भारती एअरटेलचा वाटा मात्र 28 टक्केवरुन 32 टक्के इतका वाढला आहे. बीएसएनएलचा वाटा 2.96 टक्केवरुन 8.71 टक्के वाढला आहे.









