प्रतिनिधी / सातारा :
कोरोना पाठोपाठ ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. याचा संसर्ग मुलांना होवू नये म्हणून जिल्ह्यात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ही लस सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालय या ठिकाणी सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी लसीकरण होणार असल्याची माहिती लसीकरण मोहीम अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी सांगितले.
जिल्ह्यात 18 वर्षापुढील सर्व वयोगटातील नागरिकांचे लसीकरण युद्धपातळीवर करण्यात आले. अद्याप काही जण लसीच्या दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. याच प्रार्श्वभूमीवर ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे. मुलांना यांचा संसर्ग होवू नये म्हणून येत्या 3 जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. त्यानुसार लसीकरणाची तयारी सुरू झाली आहे. लसीसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक नाही. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालय 15 ते 18 वयोगटातील मुलांना लस घेता येणार आहे. सकाळी 9 ते 5 या वेळेत मुले लस घेवू शकतात. दीड लाखाच्या आसपास मुलांची संख्या आहे. या संख्येनुसार कोव्हॅक्सीन लसीचे 1 लाख 10 हजार डोस उपलब्ध आहेत. अजून लस उपलब्ध होणार आहे. यामुळे लसीचा कोणताही तुटवडा निर्माण होणार नसल्याचे डॉ. शिर्के यांनी सांगितले.









