15 ते 18 वयोगटातील मुलांना मिळणार पहिला डोस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ होणार आहे, अशी महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजता त्यांनी देशाला उद्देशून दिलेल्या संदेशात ही घोषणा केली. तसेच 10 जानेवारीपासून आरोग्य आणि आघाडीवरील कर्मचाऱयांसह (फ्रन्टवर्कर्स) 60 वर्षांवरील वयस्करांना ‘प्रीकॉशन डोस’ (बुस्टर) देण्यास प्रारंभ केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. याचदरम्यान कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ रुपाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझर यांचा सातत्याने उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना काळात भारताने केलेल्या कामगिरीचा आढावा त्यांनी घेतला. केंद्र सरकारने आणि राज्यसरकारांनी योग्य प्रकारे व्यवस्थापन केल्याने देशात अतिशय कमी वेळात 141 कोटी लोकांना लसीची एकतरी मात्रा दिली आहे. 50 टक्क्यांहून अधिक जनसंख्येचे दोन मात्रांचे (डोस) लसीकरण पूर्ण झाले आहे. सर्व नागरीकांच्या आणि आरोग्य कर्मचाऱयांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले आहे. कोरोनाचा धोका निर्माण होताच भारताचे वैज्ञानिक लसनिर्मितीच्या प्रयत्नाला लागले होते. त्यामुळे लवकरात लवकर प्रभावी लस निर्माण करण्यात त्यांना यश आले. परिणामी, लसीकरणाचा वेग वाढला असे प्रतिपादन त्यांनी केले.
मुलांचे लसीकरण
कोरोनाच्या नव्या रुपांच्या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्याचे अभियान सुरु केले जाणार आहे. यासंबंधी बरीच चर्चा सरकारने आपल्या सल्लागारांशी केलेली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मुलांची सुरक्षा ही सध्याच्या परिस्थितीत महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.
आरोग्य कर्मचारी, वयस्करांना प्रीकॉशन डोस
देशातील सर्व आरोग्य कर्मचाऱयांना (हेल्थ वर्कर्स) येत्या 10 जानेवारीपासून कोरोना लसीचा ‘प्रीकॉशन’ डोस देण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे. हे कर्मचारी कोरोना विरुद्धच्या संघर्षात आघाडीवर राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे. तसेच फ्रन्टलाईन वर्कर्सनाही हा डोस दिला जाणार आहे. त्यांच्या प्रमाणे 60 वर्षे वयावरील वयस्कर, ज्यांना गंभीर आजार आहेत, त्यांनाही प्रीकॉशन म्हणजेच बुस्टर डोस दिला जाणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी पेले.
भारताची सज्जता
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारताने पहिल्या दोन उद्रेकांच्या पार्श्वभूमीवर व अनुभवावर मोठी सज्जता ठेवली आहे. देशभरात 5 लाख ऑक्सिजन बेड्स सज्ज आहेत. 90 हजार बेड्स विशेषतः मुलांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहेत. पुरेसा ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी नवीन उत्पादन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. राज्यांना सर्व सज्जता ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. औषधे आणि इतर सामग्रीची सज्जता आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.









