काय सांगतो नियम?
दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादवर सनसनाटी मात केली, त्यात आफ्रिकन जलद गोलंदाज कॅगिसो रबाडाचे 29 धावातील 4 बळी विशेष महत्त्वाचे ठरले. रबाडाच्या खात्यावर आता 16 सामन्यातून 29 बळी आहेत आणि जसप्रित बुमराहला मागे टाकत पर्पल कॅपच्या यादीत त्याने अव्वलस्थान काबीज केले. अर्थात, या लढतीत एका नियमामुळे असेही नाटय़ घडले, ज्यात रबाडाने सलग 3 ‘अधिकृत’ चेंडूत सलग 3 बळी घेऊन देखील त्याला हॅट्ट्रिकपासून वंचित रहावे लागले.
सनरायजर्स हैदराबादला शेवटच्या 2 षटकात 30 धावांची गरज असताना समद व रशीद खान उत्तम फटकेबाजी करत होते आणि यामुळे सामन्यात रंगत होती. समदने रबाडाच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचत उत्तम सुरुवातही केली. पण, त्यानंतर रबाडाने समदला बाद केले आणि पुढील दोन अधिकृत चेंडूंवर रशीद खान व श्रीवत्स गोस्वामी यांनाही तंबूचा रस्ता दाखवला. अर्थात, चौथ्या चेंडूवर विकेट घेण्यापूर्वी रबाडाने एक चेंडू वाईड टाकला होता आणि यामुळे रबाडा अधिकृत 3 चेंडूंवर 3 बळी घेतल्यानंतरही हॅट्ट्रिकपासून वंचित राहिला.
नियमानुसार, सलग तीन चेंडूंवर तीन बळी घेतले गेले तरच ते हॅट्ट्रिकमध्ये मोजले जाते आणि रबाडाने या 3 बळीत एक वाईड टाकला असल्याने ही हॅट्ट्रिक मोजली गेली नाही.









