20 लाख मोबाईल क्रमांकांवरही टांगती तलवार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने शुक्रवारी दूरसंचार ऑपरेटर्सना 28,200 मोबाईल हँडसेट्सना ब्लॉक करण्याचा निर्देश दिला आहे. तसेच सरकारने या हँडसेट्सशी संबंधित 20 लाख मोबाईल क्रमांकांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्देश दिला आहे. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीकरता मोबाईल फोनचा गैरवापर रोखण्यासाठी दूरसंचार विभाग, गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांसोबत मिळून काम करत असल्याचे दूरसंचार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
या विभागांच्या एकजूट प्रयत्नाचा उद्देश गुन्हेगारांचे नेटवर्क नष्ट करणे आणि नागरिकांना डिजिटल धोक्यांपासून वाचविणे आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये 28,200 मोबाईल हँडसेट्सचा वापर करण्यात आल्याचे गृह मंत्रालय आणि राज्य पोलिसांकडून करण्यात आलेल्या विश्लेषणातून समोर आले आहे.
या मोबाईल हँडसेट्ससोबत 20 लाख मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आला होता. यामुळे दूरसंचार विभागाने पूर्ण देशात 28,200 मोबाईल हँडसेट्स ब्लॉक करणे आणि या हँडसेट्सशी निगडित 20 लाख मोबाईल कनेक्शन्सची तत्काळ पुनर्पडताळणी करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना निर्देश जारी केले आहेत.
पुनर्पडताळणी करण्यास अयशस्वी ठरल्यास संबंधित मोबाईल कनेक्शन रद्द करण्याचा निर्देश दूरसंचार विभागाने दिला आहे. दूरसंचार विभागाने सायबर गुन्ह्याप्रकरणी हे पाऊल उचलले आहे. वित्तीय घोटाळ्यासाठी वापरण्यात आलेला एका मोबाईल क्रमांकाची सेवा अलिकडेच बंद करण्यात आली. तसेच त्या क्रमांकाशी निगडित 20 मोबाईल हँडसेट्स ब्लॉक करण्यात आले होते.









