वृत्तसंस्था/ मुंबई
पुरुष व महिलांसाठी वर्ल्ड पॅडेल लीगची दुसरी आवृत्ती पुढील वर्षी 6 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत येथे होणार आहे. या लीगमध्ये जगभरातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
फ्रँचायजींच्या संघांच्या सहभागाची पहिली लीग दुबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. पॅडेल हा टेनिस व स्क्वॅशसारखा रॅकेटचा खेळ असून बंदिस्त जागेत मधल्या भागात नेट लावून खेळला जातो. मात्र त्याच्या कोर्टचा आकार टेनिस कोर्टपेक्षा बराच लहान असतो. स्क्वॅशप्रमाणे बंदिस्त जागेत चेंडू बाऊन्स झाल्यावर रॅकेटने फटके मारायचे असतात. 1970 च्या दशकात मेक्सिकोच्या एन्रिक कॉरक्युएरा यांनी हा खेळ विकसित केला. हा खेळ एकेरी व दुहेरीत खेळता येतो.
‘पॅडेल हा क्रीडा प्रकार भारतामध्ये वेगात वाढत असून या खेळातील लोकांचा रस वाढीस लागला आहे. वर्ल्ड पॅडेल लीग आता भारतात होणार असल्याने या खेळाची भारतातील लोकप्रियता वाढत असल्याचेच दिसून येतो,’ असे भारतीय पॅडेल फेडरेशनच्या अध्यक्षा स्नेहा अब्राहम सेहगल म्हणाल्या.