‘मोदक निवेश’ योजनेचा थाटात शुभारंभ
प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 29 वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थापना दिन तसेच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्यने ‘मोदक निवेश’ ही आकर्षक व्याजदर योजना सुरू केली. लोकमान्य सोसायटीचे संचालक तसेच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नव्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
गुरुवारपेठ, टिळकवाडी येथील लोकमान्य सोसायटीच्या प्रधान कार्यालयात स्थापना दिनाचा कार्यक्रम पार पडला. सकाळी सोसायटीचे संचालक सुबोध गावडे यांच्या हस्ते सपत्निक सत्यनारायण पूजा झाली. संस्थेचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, डॉ. दामोदर वागळे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजीत दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, सीएसओ निवृत्त कर्नल दीपक गुरुंग, रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून स्थापना दिनाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते ‘मोदक निवेश’ योजनेचा शुभारंभ झाला.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना संचालक पंढरी परब म्हणाले, मागील 29 वर्षात लोकमान्य परिवाराने केलेली प्रगती नेत्रदीपक आहे. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व विद्यमान चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी आपल्या दूरदृष्टीने इवल्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष केला आहे. सकारात्मक ऊर्जेच्या माध्यमातून त्यांनी संस्थेची प्रगती करून दाखवली. कर्मचारी तसेच ग्राहकांनीही दाखविलेल्या विश्वासामुळे लोकमान्य आज देशातील एक नामांकित वित्तीय संस्था असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सीईओ अभिजीत दीक्षित म्हणाले, लहान जागेतून लोकमान्य सोसायटीची सुरुवात करण्यात आली होती. आज देशातील चार राज्यांमध्ये 200 हून शाखांमध्ये लोकमान्यचा विस्तार पसरला आहे. 8,700 कोटी रुपयांच्या ठेवी लोकमान्य सोसायटीकडे असून शिपिंग, एव्हीएशन, एज्युकेशन, रियल इस्टेट, हॉटेल यासह इतर उद्योगांमध्ये लोकमान्य समूह अग्रेसर असल्याचे त्यांनी नमूद केले.
कर्मचाऱ्यांनी मागील 29 वर्षात घेतलेल्या मेहनतीमुळे लोकमान्यला यश मिळाल्याचे संचालक गजानन धामणेकर यांनी सांगितले. या प्रगतीमध्ये ‘तरुण भारत’चा वाटाही तितकाच आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा येथे ‘तरुण भारत’मुळेच लोकमान्यचा विस्तार होऊ शकला. कोरोना काळातही कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा दिल्यामुळे संस्था आज मोठ्या शिखरावर असल्याने त्यांनी कर्मचारीवर्गाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीआरओ राजू नाईक यांनी केले.
अशी आहे ‘मोदक निवेश’ योजना
गणेशोत्सवाच्या पार्श्शभूमीवर लोकमान्य सोसायटीने ‘मोदक निवेश’ योजना सुरू केली आहे. मुदत ठेवीवर आकर्षक असे 10.50 टक्के व्याज दिले जाणार आहे. योजनेचा कालावधी 21 महिने असून किमान गुंतवणूक दहा हजारांपासून करता येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50 टक्के अधिक व्याजदर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









