फायजर-मॉडर्नानंतर आणखी एक लस जगाला उपलब्ध होणार : हालचाली गतिमान
कोरोना विषाणूच्या विरोधात नोव्हेंबर महिन्यापर्यंत पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येणाऱया ऑक्सफोर्डच्या कोरोनावरील लसीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तर या लसीच्या तुलनेत मागे पडलेल्या फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाच्या लसी बाजारात दाखल झाल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायल समवेत जगातील अनेक देशांनी या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरीही दिली आहे.
ब्रिटनमध्ये नाताळानंतर त्वरित ऑक्सफोर्डच्या लसीला मंजुरी दिली जाऊ शकते. ब्रिटनची मेडिसीन अँड हेल्थकेयर प्रॉडक्ट रेग्युलेटरी एजेन्सी या लसीला 28 किंवा 29 डिसेंबर रोजी मंजुरी देऊ शकते. ही संस्था ऑक्सफोर्डच्या वैज्ञानिकांच्या अंतिम आकडेवारीची प्रतीक्षा करत आहे. ही आकडेवारी सोमवारी सोपविण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.
मंजुरी लवकर न मिळाल्यास..
फायजर लसीचे उपलब्ध डोस जानेवारीत संपुष्टात येतील आणि मार्चपर्यंत अन्य कुठलीच खेप येणार नाही. याचाच अर्थ ब्रिटनमध्ये लवकर कोरोनाची दुसरी लस उपलब्ध न झाल्यास लसीकरण कार्यक्रम थांबू शकतो, असा दावा ब्रिटनचे माजी आरोग्य सचिव जेरेमी हंट यांनी केला आहे. तर फायजरच्या प्रवक्त्याने हा दावा फेटाळून लावत लसीचा पुरवठा निर्धारित वेळेत केला जात असल्याचे सांगितले आहे. ब्रिटनला मार्चपूर्वीच लसीची नवी खेप मिळणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
10 कोटी डोसची मागणी
ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने ऑक्सफोर्डला 10 कोटी लसीचे डोस तयार करण्याची ऑर्डर यापूर्वीच दिली आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्डच्या लसीला डिसेंबरमध्ये अनुमती देण्यात आल्यास देशातील सर्व फुटबॉल आणि क्रिकेटची मैदाने जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात खुली केले जाऊ शकतात. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लसीसंबंधी आमची समीक्षा अद्याप सुरू आहे. लसीला मंजुरी देण्यासाठी अधिकृत लस सुरक्षा, गुणवत्ता आणि प्रभावीपणाच्या अपेक्षित मापदंडांची पूर्तता करत असल्याचे सुनिश्चित करणारी प्रक्रिया सुरू असल्याचे ब्रिटनच्या नियामकीय यंत्रणेच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
सामान्य तापमानात ठेवता येणार
ब्रिटनमध्ये आतापर्यंत 1 लाख 40 हजार लोकांना फायजर बायोएनटेकची लस देण्यात आली आहे. या लसीला उणे 70 अंश तापमानात ठेवावे लागते. तर ऑक्सफोर्डच्या लसीला खोलीतील सामान्य तापमानातही ठेवता येणार आहे. अशा स्थितीत या लसीची मागणी मोठी असून दुर्गम भागापर्यंत ती नेण्यास मोठी सुविधा होणार आहे. या लसीवरच अनेक देशांची मोहीम अवलंबून आहेत.









