पाकिस्तानी जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर ‘बीएलए’चा हल्ला
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्याच्या जवानांवर पुन्हा एकदा मोठा हल्ला झाला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) कराचीहून क्वेट्टाला जाणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांच्या बसला आयईडी स्फोटाद्वारे लक्ष्य केले. या हल्ल्यात 29 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. तसेच बीएलएने केलेल्या आणखी एका हल्ल्यात 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. यासोबतच, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने (बीएलएफ) कलाट आणि झाऊ येथेही हल्ले करत अनेक पाकिस्तानी सैनिक मारल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी सैन्याने चकमकीची कबुली दिली आहे. मात्र, मृत सैनिकांचा नेमका आकडा जाहीर केलेला नाही.
बीएलएने कलाटमधील निमराग क्रॉस येथे कराचीहून क्वेट्टाला जाणाऱ्या लष्करी बसवर हल्ला केला. या हल्ल्यात 29 लष्करी जवान ठार झाले. तसेच अन्य काहीजण जखमी झाले. सदर बसमधून सर्वसामान्य नागरिक आणि कव्वाली कलाकारदेखील प्रवास करत होते. मात्र, जवानांची संख्या सर्वाधिक होती. बीएलएच्या अन्य एका हल्ल्यात गंजी भागात आयईडीचा स्फोट केल्याने दोन सैनिक ठार झाले. तसेच सात जण जखमी झाले.
‘बीएलएफ’च्या हल्ल्यात 10 सैनिकांचा मृत्यू
बीएलएफने एक निवेदन जारी करत आपल्या सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यावर दोन वेगवेगळे हल्ले केल्याचे जाहीर केले आहे. पहिला हल्ला क्वेट्टा-कराची महामार्गावर एका रिमोट-कंट्रोल्ड आयईडीने करण्यात आला. यात एका लष्करी वाहनाला लक्ष्य केल्याने चार सैनिक ठार झाले. तर, दुसरा हल्ला आवारन जिह्यातील झाऊ येथे झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याच्या एका मेजरसह 6 सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे.









