केनियातील धक्कादायक प्रकार ः स्वर्गात स्थान मिळणार असल्याची बतावणी
नैरोबी
आफ्रिकेतील केनिया या देशात एका ख्रिश्चन पाद्रीच्या सांगण्यावरून 29 लोकांनी उपाशी राहून सामूहिक आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या लोकांचे मृतदेह किल्फी प्रांतात शाकाहोला जंगलातून हस्तगत केले आहेत. गुड न्यूज इंटरनॅशनल चर्चच्या पाद्रीने उपाशी राहून स्वतःला दफन करून घेतल्यास स्वर्गात स्थान मिळणार असल्याचे आमिष या लोकांना दाखविले होते. आत्महत्या केलेल्या या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.
केनियाच्या पोलिसांनी एका कब्रमधून एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. पोलिसांना आतापर्यंत 65 कब्र सापडल्या असून यातील मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. मृतांचा आकडा खूपच अधिक असावा असे पोलिसांनी म्हटले आहे. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचा देखील समावेश आहे.
या घटनेचा खुलासा झाल्यावर पोलिसांनी पॉल मॅकेन्झी नावाच्या पाद्रीला अटक केली आहे. आपण आत्महत्येसाठी लोकांना प्रेरित केले नसल्याचा दावा तो करत आहे. 2019 मध्येच चर्च बंद करण्यात आले होते असे त्याचे म्हणणे आहे. तर पोलिसांनी आरोपीची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला आहे. पोलीस सध्या सर्व मृतदेहांवरून डीएनए नमुने मिळवत आहेत.
पाद्री पॉल मॅकेन्झीमुळे यापूर्वी दोन मुलांचा मृत्यू झाला होता. तेव्हा या मुलांच्या आईवडिलांच्या तक्रारीवर त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळी पॉलला 10 हजार केनियन शिलिंग म्हणजेच केवळ 6 हजार रुपयांच्या दंडावर मोकळे सोडण्यात आले होते. यानंतर 14 एप्रिल रोजी पोलिसांना 11 जणांचे मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे.









