पुणे / वार्ताहर :
पुण्यातील 48 वर्षीय व्यक्तीने मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी एका खासगी सावकाराकडून 7.50 लाख रुपये उधारीवर घेतले होते. त्याबदल्यात 20 लाख 74 हजार रुपयांची परतफेड त्यांनी केली. मात्र, त्यानंतरही आणखी 8.50 लाखांसाठी तगादा लावत जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासगी सावकाराला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
नीरजकुमार रामचंद्र मंडळ (वय 45, रा. पिंपळे गुरव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या खासगी सावकारचे नाव आहे. त्याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार मे 2017 ते एप्रिल 2023 यादरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी मुलीच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी आरोपी नीरजकुमार मंडल यांच्याकडून पाच आणि चार टक्के व्याजदराने एकूण 7.50 लाख घेतले होते. त्याच्या बदल्यात तक्रारदार यांनी आरोपी जून 2017 ते मे 2022 पर्यंत 7.50 लाख रुपयांच्या मोबदल्यात 13 लाख रुपये रोख व 7.74 लाख ऑनलाइन स्वरूपात असे एकूण 20 लाख 74 हजार रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही आरोपी तक्रारदार यास फोन करून त्याच्या घरात आणि ऑफिसमध्ये येऊन शिवीगाळ करून खोटय़ा गुह्यात अडकवण्याची भीती घालत होता. तसेच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. याप्रकरणी तक्रारदार यांनी खडकी पोलिसात धाव घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस पाटील करत आहेत.
दरम्यान, पुण्यातील छोटे व्यावसायिक, रिक्षाचालक, हातावर पोट असणारे गोरगरिब अशा सावकरांच्या जाळ्यात अडकल्याचे पाहायला मिळते. मात्र, जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत प्रशासनाला कारवाई करता येत नाही. अनेक जण खासगी सावकारांविरोधात तक्रार करण्यास घाबरतात. त्यामुळे पुण्यातील खासगी सावकारांचा धंदा सध्या जोमाने सुरू आहे.









