कमिन्स, लियॉनचे प्रत्येकी 4 बळी, इंग्लंड सर्व बाद 273, रूट-ब्रुकच्या प्रत्येकी 46 धावा
वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
अॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेतील येथे सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी चहापानाच्या सुमारास इंग्लंडचा दुसरा डाव 273 धावांत आटोपल्याने ऑस्ट्रेलियाला 281 धावांचे आव्हान मिळाले आहे. कर्णधार कमिन्स व फिरकी गोलंदाज लियॉन यांनी प्रत्येकी 4 बळी मिळविले.
लियॉनच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाने सामन्यावरील पकड मजबूत केली. उपाहारावेळी इंग्लंडने 5 बाद 155 धावा जमवित ऑस्ट्रेलियावर 162 धावांची आघाडी मिळविली होती. उपाहारा ते चहापान या सत्रात इंग्लंडच्या उर्वरित 5 गड्यांनी आणखी 118 धावांची भर घातली. रूट 46, ब्रूक 46, कर्णधार स्टोक्स 43, बेअरस्टो 20, मोईन अली 19, ऑली रॉबिन्सनने 27 धावा जमविल्या. ब्रॉडने नाबाद 10 तर अँडरसनने 12 धावा काढल्या. लियॉन व कमिन्स यांच्याशिवाय हेझलवुड, बोलँड यांनी एकेक बळी मिळविला.
या कसोटीत इंग्लंडने आपला पहिला डाव 8 बाद 393 धावांवर घोषित केला होता. रुटने नाबाद शतक तर बेअरस्टो आणि क्रॉले यांनी अर्धशतके झळकाविली. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 116.1 षटकात 386 धावांवर रोखले.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये उस्मान ख्वॉजाने शतक झळकाविले. तर हेड आणि कॅरे यांनी अर्धशतके झळकाविली. दरम्यान, रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर पावसाचा अडथळा आल्याने जवळपास खेळाची दोन सत्रे वाया गेली. या कालावधीत इंग्लंडने खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर 2 बाद 28 धावा जमविल्या होत्या. ढगाळ वातावरणाचा फायदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुरेपूर उठविला. क्रॉले आणि डकेट या सलामीच्या जोडीने 27 धावांची भागिदारी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने इंग्लंडला पहिला धक्का देताना डकेटला ग्रीनकरवी झेलबाद केले. त्याने 28 चेंडूत 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. त्यानंतर बोलँडने क्रॉलेला कॅरेकरवी झेलबाद केले. त्याने 7 धावा जमविल्या होत्या.

इंग्लंडने 2 बाद 28 या धावसंख्येवरुन सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवसाला पुढे प्रारंभ केला आणि उपहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात आणखी 3 गडी गमाविताना 127 धावांची भर घातली. पहिल्या डावात शतक झळकाविणाऱ्या रुटने पॉप समवेत तिसऱ्या गड्यासाठी 50 धावांची भागिदारी केली. स्विंग गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवरऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेतला. खेळाच्या पहिल्या सत्रातील पहिल्या 20 मिनिटांच्या कालावधीत पॉप आणि रुट या जोडीने केवळ चेंडू तटविण्यावर भर दिला होता. बचावात्मक फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या या जोडीला ऑस्ट्रेलियाच्या स्विंग गोलंदाजीने चांगलेच जखडले होते. कर्णधार कमिन्सच्यायॉर्करवर पोपचा त्रिफळा उडाला. त्याने 16 चेंडूत 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. पॉप बाद झाल्यानंतर मैदानात फलंदाजीस आलेल्या ब्रूकने रुटला बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 52 धावांची भागिदारी केली.
कर्णधार कमिन्सने इंग्लंडची ही जोडी फोडण्यासाठी गोलंदाजीत वारंवार बदल केला. अखेर फिरकी गोलंदाज लियॉनने ऑस्ट्रेलियासमोरील हे प्रमुख अडथळे दूर केले. लियॉनच्या चेंडूवर स्विपचा फटका मारण्याच्या नादात पुढे आलेल्या रुटला यष्टीरक्षक कॅरेने यष्टीचीत केले. रुटने 55 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 46 धावा जमविल्या.

लियॉनने ब्रूकला लाबूशेनकरवी झेलबाद केले. ब्रूकने 52 चेंडूत 5 चौकारांसह 46 धावा जमविल्या. ब्रूक बाद झाला त्यावेळी इंग्लंडची स्थिती 5 बाद 150 अशी होती. कर्णधार स्टोक्स आणि बेअरस्टो यांनी उपहारापर्यंत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. उपाहारावेळी स्टोक्स 1 चौकारासह 13 तर बेअरस्टो एका धावेवर खेळत होते. इंग्लंडने उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियावर 162 धावांची आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियातर्फे कमिन्स आणि लियॉन यांनी प्रत्येकी 2 तर बोलँडने 1 गडी बाद केला होता.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड प. डाव : 78 षटकात 8 बाद 393 डाव घोषित, ऑस्ट्रेलिया प. डाव 116.1 षटकात सर्व बाद 386, इंग्लंड दु. डाव 66.2 षटकात सर्व बाद 273 (क्रॉले 7, डकेट 19, रुट 46, ब्रूक 46, पोप 14, स्टोक्स 43, बेअरस्टो 20, मोईन अली 19, रॉबिन्सन 27, ब्रॉड नाबाद 10, अँडरसन 12, अवांतर 10, कमिन्स 4-63, लियॉन 4-80, हेझलवुड 1-48, बोलँड 1-61.









