38 हजार 705 रुपयांचा दंड वसूल : महापालिकेच्या मोहिमेमुळे व्यावसायिकांतून तीव्र नाराजी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरामध्ये प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्रगतीने राबविण्यात येत आहे. गुरुवारी शहरामध्ये विविध ठिकाणी जाऊन दुकाने व इतर व्यावसायिकांची तपासणी करून 280 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. 38 हजार 705 रुपये दंडदेखील वसूल करण्यात आला आहे. यामुळे व्यावसायिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये प्लास्टिकविरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी व आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ, हणमंत कलादगी यांच्या मार्गदर्शनाखाली काही पथके मोहीम राबवत आहेत. शहर तसेच उपनगरांमध्ये मोहीम राबविण्यात येत आहे. बुधवारीही मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. याचबरोबर दंडही वसूल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 280 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.
महापालिकेच्या या मोहिमेमुळे व्यावसायिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करून द्यावा, त्यानंतर ही मोहीम राबवावी, अशा प्रतिक्रिया दुकानदारांतून व्यक्त होत आहेत. एक तर प्लास्टिक जप्त केले जाते. त्यानंतर दंडही वसूल केला जात आहे. त्यामुळे आपण व्यवसाय कसा करावा? असा प्रश्नदेखील व्यावसायिक करू लागले आहेत.









