गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून तात्पुरती यादी प्रसिद्ध : पटसंख्या घटल्याने निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यामुळे शहरातील अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठी, कन्नड व उर्दू माध्यमाचे एकूण 28 शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यामुळे या शिक्षकांना इतरत्र बदली दिली जाणार आहे.
दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांची संख्या कमी करण्यात येणार आहे. यावर्षी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. शहरात तर विद्यार्थी मिळणेही अवघड झाले आहे. अंगणवाडीमध्येच विद्यार्थी नाहीत तर शाळांमध्ये कुठून आणणार? असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. काही शाळांमध्ये शहरालगतच्या ग्रामीण भागातून विद्यार्थी आणून पटसंख्या वाढविण्याचे प्रयत्न शिक्षकांकडून सुरू आहेत. बेळगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांची तात्पुरती यादी तयार केली आहे. यामध्ये कन्नड विषय शिक्षकांची सर्वाधिक संख्या आहे. ज्याठिकाणी पटसंख्या घटली आहे, त्याठिकाणचे शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले आहेत. यामुळे या शिक्षकांना ज्या शाळांमध्ये पटसंख्या अधिक आहे त्या शाळांमध्ये पाठविण्याचा विचार शिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने केला जात आहे.
बेळगाव ग्रामीणची यादी उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता
शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पाठोपाठ ग्रामीण गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर केली जाणार आहे. बेळगाव ग्रामीणची यादी सोमवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता शिक्षकांनी व्यक्त केली आहे. तालुक्यातील बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थी संख्या घटल्याने नेमक्या कोणत्या शिक्षकांचा अतिरिक्त यादीमध्ये समावेश होतो, हे पहावे लागणार आहे. याचप्रकारे इतर तालुक्यांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कन्नड विषय शिकविणार कोण?
सध्या शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या अतिरिक्त शिक्षकांच्या यादीमध्ये कन्नड विषय शिक्षकांची सर्वाधिक संख्या आहे. दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या मराठी शाळांमध्ये मराठी व कन्नड विषय शिक्षक होते. परंतु यापैकी कन्नड विषय शिक्षकांचा अतिरिक्त यादीमध्ये समावेश करण्यात आल्याने शाळांमध्ये कन्नड विषय शिकविण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.









