ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आर्थिक सुधारणा आणि करचुकवेगिरीला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे जुलैमध्ये वार्षिक आधारावर GST संकलन 28 टक्क्यांनी वाढून 1.49 लाख कोटींवर पोहोचले आहे. जुलै 2021 मध्ये GST संकलन 1,16,393 कोटी रुपये होते. अर्थमंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून यावर्षी जुलैमध्ये मासिक कर संकलन दुसऱ्या स्थानावर आहे. याआधी एप्रिल 2022 मध्ये कलेक्शनने 1.68 लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. पुनरावलोकनाधीन कालावधीत वस्तूंच्या आयातीतून मिळणाऱ्या महसूलात 48 टक्क्यांनी वाढ झाली. देशांतर्गत व्यवहारातून महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत 22 टक्क्यांनी अधिक होता.
जुलै 2022 मध्ये जीएसटीच्या रुपाने एकूण 1.49 लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले. जूनमध्ये जीएसटीच्या माध्यमातून 1.44 लाख कोटी, मे महिन्यात 1.40 लाख कोटी, एप्रिलमध्ये 1.67 लाख कोटी तर मार्चमध्ये 1.42 लाख कोटींची गंगाजळी जमा झाली होती.