13 जणांची फसवणूक केल्याचे उघड : गुन्हा शाखेकडून गुन्हा नोंद,संशयित डॉक्टर महिलेला अटक
पणजी : विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून म्हापसा येथील नवरा व बायकोने मिळून 13 जणांची फसवणूक केली आहे. एकूण 27 लाख 73 हजार 540 ऊपयांना लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत गिरी येथील संजना महेश बिचोलकर यांनी गुन्हा शाखेकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा शाखेने डॉक्टर महिलेला अटक केली आहे. संशयितांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318, 336 तसेच इमिग्रेशन कायदा कलम 10 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांमध्ये डॉ. मीना पुजा गोप आणि अरविंद संदीप गोप यांचा समावेश असून डॉ. मीना हिला अटक केली असून अरविंद गोप याचा शोध सुऊ आहे. मीना पुजा गोप हिची कसून उलटतपासणी केली असता 13 जणांना त्यांनी गंडा घातल्याचे उघड झाले आहे. सप्टेंबर 2020 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुऊ होता.
दोन्ही संशयितांनी नोकर भरतीसाठी एजंट म्हणून काम केले आणि तक्रारदारास न्यूझीलंडमध्ये विक्री विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून 8 लाख 50 हजार ऊपयांना लुटले. प्रक्रिया शुल्क आणि अन्य कामांचे निमित्त पुढे करून तक्रारदराला वेळोवेळी पैसे देण्यास प्रवृत्त केले. तक्रारदार वेळोवेळी केवळ नोकरीच्या आशेने गुगल पे द्वारा पैसे पाठवित राहिला. मात्र संशयित 2020 पासून आत्तापर्यंत नोकरी देण्यास अपयशी ठरले आहेत. संशयितांनी बनावट व्हिसा कागदपत्र तयार केले. पुढे संशयित इतर 12 पीडितांना न्यूझीलंड येथे नोकरी देण्यास अयशस्वी झाल्यामुळे फिर्यादीची आणि 12 पीडितांची वेगवेगळ्या व्यवहारात 27 लाख 73 हजार 540 ऊपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. गुन्हा शाखेचे अधीक्षक राऊल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशल देसाई पुढील तपास करीत आहेत.









