2 आरोपींची पुराव्यांअभावी मुक्तता : एनआयए न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/लखनौ
चंदन गुप्ता हत्याप्रकरणी लखनौ येथील विशेष एनआयए न्यायालयाने 28 जणांना दोषी ठरविले असून 2 आरोपींची पुराव्यांअभावी मुक्तता केली आहे. 26 जानेवारी 2018 रोजी उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये तिरंगा यात्रेदरम्यान चंदन गुप्ताची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर शहरात दंगल भडकली होती. हत्येप्रकरणी सलीम, वसीम वकार मुख्य आरोपी होते. चंदन गुप्ता हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तसेच एक सामाजिक संस्थाही चालवत होता. तिरंगा यात्रेदरम्यान चंदनची हत्या झाल्यावर कासगंज येथे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. यानंतर शहरात जाळपोळ अन् तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकूण 49 जणांना अटक केली होती. हिंदुस्थान जिंदाबाद म्हणणे गुन्हा असेल तर आम्हालाही गोळ्या घाला अशा शब्दांत चंदनचे वडिल सुशील गुप्ता यांनी व्यथा व्यक्त केली होती. तर राज्य सरकारकडून कासगंजच्या हिंसेत जीव गमावणाऱ्या चंदनच्या नावावर एक चौक स्थापन करण्याची घोषणा केली होती. याचबरोबर चंदनच्या बहिणीला शासकीय नोकरी मिळवून देण्यात आली होती.
काय घडले होते त्या दिवशी
कासगंजमध्ये 26 जानेवारी 2018 रोजी अखिल विश्व हिंदू परिषद, भारतीय विद्यार्थी परिषद आणि हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी तिरंगा यात्रा आयोजित केली होती. 100 दुचाकींवरून तिरंगा आणि भगवा ध्वज घेऊन या संघटनांचे कार्यकर्ते यात्रा काढत होते आणि यात चंदन गुप्ताही सामील झाला होता. कासगंज येथील ब•tनगरमध्ये यात्रेत सामील काही युवकांची तेथील मुस्लीम युवकांशी झटापट झाली होती. त्यानंतर ब•tनगर येथे तिरंगा यात्रेवर दगडफेक करण्यात आली होती. याचदरम्यान एका समाजकंटकाने झाडलेली गोळी चंदनला लागली होती. या यात्रेत अफरातफरीची स्थिती निर्माण झाली. चंदन या गोळीबारात मृत्युमुखी पडला होता. या घटनेनंतर कासगंजमध्ये सुमारे आठवडाभर दंगली भडकत होत्या.









