राजस्थानातील शेतकऱयांना तारांच्या कुंपणापलिकडे जाता येणार
वृत्तसंस्था/ बाडमेर
भारत-पाकिस्तान सीमेच्या तारेच्या कुंपणाच्या पलिकडे असलेल्या जमिनीवर पंजाबचे शेतकरी अनेक वर्षांपासून शेती करत आले आहेत. पण या अधिकारापासून वंचित राहिलेले पश्चिम राजस्थानच्या शेतकऱयांना आता स्वतःच्या जमिनींवर शेती करण्याचा अधिकार मिळू शकणार आहे. राज्यातील बाडमेरचे शेतकरी आता सीमापार असलेल्या स्वतःच्या जमिनीवर शेती करू शकतील. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) याकरता स्वतःची तयारी सुरू केली आहे.
सीमावर्ती बाडमेरमध्ये बीएसएफच्या पुढाकारामुळे 28 वर्षांनी भारत-पाकिस्तान सीमा कुंपण आणि झिरो पॉइंटदरम्यान फसलेल्या हजारो शेतकऱयांच्या शेकडो एकर जमिनीचा हक्क आता शेतकऱयांना मिळू शकणार आहे. राजस्थानात 1992 मध्ये तारांचे कुंपण घालण्यात आल्यावर हजारो शेतकऱयांची जमीन झिरो पॉइंट आणि कुंपणादरम्यान गेली आहे. बीएसएफने आता शेतकऱयांना त्यांच्या नावावरील जमिनीवर शेती करण्याची सूट दिली आहे. याकरता बीएसएफकडून नवे प्रवेशद्वारही तयार करण्यात आले आहे. भारत-पाकिस्तान सीमेच्या तारांच्या कुंपणावर लावण्यात आलेले गेट आता खुले होत शेतकरी बीएसएफकडून प्रदान करण्यात आलेली ओळखपत्रे दाखवून शेतीसाठी जाऊ शकतील.
पाइपलाइन टाकता येणार
केवळ पावसाळीच नव्हे तर टय़ूबवेलद्वारे शेतीसाठी कुंपणाखालून पाइपलाइन नेता येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण या भागात शेतीसाठी जाणाऱया आणि परतणाऱया शेतकऱयांवर कठोर देखरेखीसह त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. पंजाबच्या धर्तीवर आता जाटों का बेरा, सारला भागात शेतकऱयांना शेती करण्यासाठी गेट खुले करण्याची सूट देण्यात येत आहे.
तारांचे कुंपण
भारताने आंतरराष्ट्रीय सीमेवर 100 मीटर आत तारांचे कुंपण तयार केले आहे. पण शेतकऱयांना याकरता काही हिस्स्याचीच भरपाई मिळाली आहे. उर्वरित जमीन 28 वर्षांपासून शेतकऱयांच्या नावावर नोंद आहे, पण शेतकऱयांना तेथे शेतीसाठी जाता येत नव्हते. बीएसएफ महासंचालक विनित कुमार यांनी काही दिवसांपूर्वी पूर्व सारला भागात शेतकऱयांसोबत बैठक घेत शेतीसाठी सीमापार जाण्याकरता अर्ज करण्याची सूचना केली. अर्ज करून पास मिळवा आणि निर्धारित नियमांचे पालन करत तारेच्या कुंपणापलिकडे शेती आणि सिंचन व्यवस्थाही करा असे त्यांनी म्हटले होते.









