समाजासाठी दिपस्तंभ बनलेल्या व्यक्ती व संस्थांचा होणार गौरव : स्वातंत्र्याचा अमृतवेध विशेषांक प्रकाशन व स्नेहमेळाव्याचे आयोजन
प्रतिनिधी/रत्नागिरी
‘तरुण भारत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा 27 वा वर्धापन दिन मंगळवार 29 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यामध्ये उल्लेखनीय कार्याद्वारे समाजासाठी दीपस्तंभ बनलेल्या 9 निवडक व्यक्ती व संस्थांचा ‘तरुण भारत सन्मान’ ने गौरव व विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे.
‘तरुण भारत’ने जिल्ह्यात 27 वर्षांची दमदार वाटचाल करताना वाचकांशी बांधिलकी आणि औचित्य विश्वासार्हतेचे अतूट नाते जपले आहे. कोकणची संस्कृती, लोकजीवन, साहित्य, कला, कीडा, राजकारण, समाजकारण, असे अनेक पैलू पानोपानी सापडतील. असे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचे दैनिक म्हणजे ‘तरूण भारत’. हिरवीगार वनश्री आणि सागराने कुशीत घेतलेल्या रत्नागिरीचे मुखपत्र म्हणजे तरूण भारत. ही आजवरची वाटचाल म्हणजे असंख्य वाचकांशी बांधिलकी आणि 27 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आमच्यावरील दृढ विश्वास या कार्यकमाच्या माध्यमातून वृध्दींगत होणार आहे.
या 27 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘स्वातंत्र्याचा अमृतवेध’ या विशेषांकाचे प्रकाशन केले जाणार आहे. तर आपल्या उल्लेखनीय कार्याद्वारे समाजाला ‘प्रकाशवाटा’ दाखवणाऱ्या काही निवडक व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरव ‘तरुण भारत सन्मान’ पुरस्काराने केला जाणार आहे. यावेळी स्नेहमेळाव्याचेही आयोजन असा हा सोहळा शहरातील माळनाका येथील मराठा भवन मंगल कार्यालय सभागृहात होणार आहे. ‘तरुण भारत’ रत्नागिरी आवृत्ती च्या या वर्धानपदिन सोहळा सायंकाळी 5.30 ते 6.00 वा. होणार आहे. कोकण विभागीय पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेषांक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमानंतर सायंकाळी 6.00 ते रात्री 8 या वेळेत आयोजित स्नेहमेळाव्यासही सर्व वाचक, हितचिंतकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ‘तरुण भारत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.









