दुसऱ्या तिमाहीतील कामगिरी : पोलाद विक्रीतही वाढ
वृत्तसंस्था / कोलकाता
भारतातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलने आपला सप्टेंबरअखेरचा तिमाहीतील नफा नुकताच जाहीर केला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने जवळपास 2760 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे.
मागच्या वर्षी पाहता कंपनी तोट्यात होती. मागच्यावर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीने 848 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. यंदा कंपनीला नफा प्राप्त करता आला असून कंपनीची तिमाहीतील कामगिरी चांगली राहिली आहे. कंपनीच्या एकूण महसुलातही सप्टेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये 6.7 टक्के वाढ झाली असून महसूल 44,584 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या दरम्यान कंपनीच्या एकंदर खर्चामध्येदेखील 6 टक्क्यांची घसरण अनुभवायला मिळाली आहे.
पोलाद विक्री वाढली
दुसरीकडे एकंदर पोलादाच्या विक्रीमध्ये 10 टक्क्यांची दुसऱ्या तिमाहीत वाढ नोंदवली गेली आहे. या योगे कंपनीने सप्टेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये 6.34 दशलक्ष टन इतक्या पोलादाची विक्री केली आहे. दुसरीकडे कंपनीने 6 लाख 90 हजार टन इतक्या पोलादाची निर्यात केली आहे. बांधकाम क्षेत्रात त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांच्या संदर्भातल्या प्रकल्पांची उभारणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने पोलादाची मागणीदेखील वाढीव राहिली आहे. याचा फायदा पोलाद कंपनीला झाला आहे.









