सौदीचा अल हिलाल क्लब करार करण्यासाठी उत्सुक : एम्बापेशी करार करण्यासाठी अनेक क्लब शर्यतीत
वृत्तसंस्था/ दुबई
फ्रान्सचा दिग्गज फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे सध्या नवीन क्लबच्या शोधात आहे. पॅरिस सेंट-जर्मेनबरोबरचा (पीएसजी) त्याचा करार पुढील वर्षी संपत आहे, परंतु क्लबने त्याला नवीन संघ शोधण्याचे आदेश दिले आहेत. एम्बाप्पेची जपान दौऱ्यासाठीही निवड झाली नाही. अशात क्लबने त्याला विकण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता ट्रान्सफर मार्केटमध्ये उपलब्ध आहे. अशात सौदी अरेबियातील एका क्लबने एम्बाप्पेला खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. यासाठी त्यांनी विक्रमी 332 दशलक्ष युरो (सुमारे 2725 कोटी रुपये) देऊ केले आहेत.
एम्बाप्पे पॅरिस सेंट-जर्मेनबरोबरचा करार जून 2024 च्या पुढे वाढवू इच्छित नाही. त्याच्या या वक्तव्याने क्लबला आश्चर्य वाटले होते. एम्बाप्पेने 2022 मध्ये पीएसजीसोबत नवीन करार केला होता व त्याने 2025 पर्यंत संघासोबत राहण्याचे आश्वासन दिले होते. एम्बाप्पे आणि पीएसजी यांच्यातील करारानुसार एम्बाप्पे 2024 पर्यंत क्लबचा खेळाडू राहील. जून 2024 नंतर तो त्याचा करार एक वर्षासाठी वाढवू शकत होता. आता एम्बाप्पेने क्लबला एक वर्ष अगोदरच पत्र लिहून जून 2024 नंतर करार वाढवणार नसल्याचे सांगितले आहे.
सौदीच्या अल हिलालकडून प्रस्ताव
दरम्यान एम्बाप्पेच्या निर्णयावर पीएसजी व्यवस्थापनाने निराशा व्यक्त केली आणि त्याला या सिझनमध्ये विकण्याचा निर्णय घेतला. आता सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबने एम्बाप्पेला करारबद्ध करण्यासाठी 2725 कोटी रुपये (332 दशलक्ष युरो) इतके विक्रमी मानधन देऊ केले आहे. अल हिलालने पीएसजीला ऑफर दिली आहे. आता एमबाप्पे आणि पीएसजीला यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे.
अनेक क्लब करारासाठी उत्सुक
केवळ अल-हिलाल क्लबच नाही तर जगभरातील सुमारे अर्धा डझन क्लब एमबाप्पेला खरेदी करण्यासाठी बोली लावू इच्छित आहेत. अल हिलाल शिवाय इंग्लंडचा टोटेनहॅम हॉटस्पर, चेल्सी, मँचेस्टर युनायटेड यांनीही एमबाप्पेला घेण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. तसेच या शर्यतीत रियल माद्रिद आणि बार्सिलोना या दोन स्पॅनिश क्लबचीही नावे पुढे आली आहेत. याचबरोबर इटलीचा क्लब इंटर मिलानलाही एम्बाप्पेशी करार करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. पीएसजीनंतर एम्बाप्पे रिअल माद्रिदमध्ये जावू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. पण याबाबत त्याने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.