सदलगा पोलिसांत घटनेची नोंद : कुलूपबंद घर चोरट्यांनी केले लक्ष्य
वार्ताहर/बेडकिहाळ
बेडकिहाळ येथील देसाई मळा परिसरातील सरोजनी हिंदुराव देसाई, संजू हिंदुराव देसाई यांच्या बंद घरातून चोरट्यांनी सुमारे 27 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सदर कुटुंबीय गावातील गणेश विसर्जन झाल्यानंतर सावंतवाडी येथे नोकरीच्या ठिकाणी गेले होते. कुलूपबंद असणाऱ्या या घरावर चोरट्यांनी पाळत ठेवत मुद्देमाल लंपास केल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी, गुरुवारी रात्री देसाई यांच्या घराचा कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तिजोरी कपाटाचे लॉकर तोडून त्यात असणाऱ्या डब्यातील सोन्याचे 2 तोडे, 4 बांगड्या, 1 पाटली, तीन पदरी हार, नेकलेस, अंगठी, एक चैन बदामसह, तसेच जुना एक्सर, टिक्का, कोल्हापुरी साज असे सुमारे 25 ते 27 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
शुक्रवारी सकाळी सुमारे 9 च्या दरम्यान संजू देसाई यांच्या मुख्य दरवाजाला एक हिरवे कापड बांधल्याचे गल्लीतील नागरिकांना दिसले. ते कापड नागरिकांनी काठीने काढल्यानंतर कुलूप तोडल्याचे लक्षात आले. त्याची माहिती नागरिकांनी त्वरित संजू देसाई व सरोजनी देसाई यांना दिली. घटनास्थळी सदलगा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार व साहाय्यक हवालदारांनी भेट दिली. दुपारी 2 च्या दरम्यान संजू देसाई व त्यांच्या आई सरोजनी देसाई गावी आल्यानंतर ऐवज लंपास केल्याचे उघड झाले.
दरम्यान, घटनास्थळी चिकोडीचे सीपीआय विश्वनाथ चौगुला, डीवायएसपी गोपाळकृष्ण गौडर यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली असून घटनास्थळी बेळगावहून श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. सदर श्वान घरापासून पूर्वेस नदीवेस रस्त्यानजीक असलेल्या किरण अलगुरे यांच्या बंद घरात गेले. त्याही घरात चोरीचा प्रयत्न झाला होता. पण तेथे काहीच ऐवज चोरट्यांच्या हाती लागला नाही. काही अंतरावरून श्वान घुटमळून परत फिरले. घटनेच्या पुढील तपासासाठी बेळगावहून ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.









