निवडणुकीत पक्षीय राजकारणाला महत्त्व येणार आहे
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना बुधवारी प्रसिद्ध झाली. यामध्ये एक प्रभाग सरासरी 25 ते 28 हजार मतदार संख्येचा आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे प्रभागात मतदार संख्या वाढली आहे. त्यामुळे निवडणुकी दरम्यान मतदारांपर्यंत पोहोचताना इच्छुकांची चांगलीच दमछाक होणार आहे.
वाढलेली मतदार संख्या पाहता सर्वसामान्य उमेदवार महापालिका निवडणुकीपासून दूर राहणार आहे. निवडणुकीत पक्षीय राजकारणाला महत्त्व येणार आहे. प्रारुप प्रभाग रचना महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात प्रसिद्ध करण्यात आली आहे. बुधवारी पहिल्याच दिवशी प्रभाग रचना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
अनेक इच्छुक आपला प्रभाग कसा झाला आहे याची माहिती घेत प्रभाग रचनेचे फोटो काढत होते. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग प्राप्त होणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती घेता येणार आहेत. यानंतर 22 सप्टेंबरपर्यंत हरकतींवर सुनावणी होईल. आक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल.
पाच ते सात हजारांचा प्रभाग 25 ते 27 हजारांवर
यापूर्वी असणाऱ्या एक सदस्यीय प्रभाग रचनेत प्रभाग साधारणत: पाच ते सात हजार मतदार संख्येचा होता. मात्र आता चार सदस्यीय प्रभाग झाल्यामुळे पाच ते सात हजारांचा एक प्रभाग आता 25 ते 27 हजार मतदार संख्येचा झाला आहे. तर प्रभाग क्रमांक 20 हा पाच सदस्यीय असून या प्रभागातील मतदार संख्या 32 हजार आहे.
पक्षीय राजकारणाला येणार महत्त्व
चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे महापालिका निवडणुकीत पक्षीय राजकारणाला महत्त्व येणार आहे. एक सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये पक्षीय राजकारणाला बगल देत अपक्ष निवडणूक लढणे शक्य होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत चार प्रभागांचा एक प्रभाग झाल्याने अपक्ष निवडणूक लढण्यास मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्षीय राजकारणाला महत्त्व असणार आहे.
सर्वसामान्य इच्छूक निवडणुकीपासून दूर
एक सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये पंधराशे ते दोन हजार मते विजयासाठी लागायची. मात्र आता चार सदस्यीय प्रभागांमुळे इच्छुकांना त्यांच्या स्थानिक प्रभागासह अन्य तीन प्रभागांमध्ये संपर्क वाढवावा लागणार आहे. तसेच आता विजयासाठी किमान दहा हजार मते घ्यावी लागणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक सर्वसामान्य इच्छुकांसाठी न परवडणारी आहे. अनेक सर्वसामान्य इच्छुकांनी आत्ताच निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मतदारांपर्यंत पोहचताना होणार दमछाक
महापालिका निवडणुकीत आता चार प्रभागात संपर्क ठेवावा लागणार आहे. त्यामुळे इच्छुकांना आता त्यांच्या स्थानिक प्रभागासह अन्य तीन प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. एक सदस्यीय प्रभाग रचनेत दोन उमेदवार तोडीस तोड असल्यास प्रचंड चुरस निर्माण होत होती. आता चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे २५ ते २८ हजार मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.








