प्रत्येक चाकूची आहे वेदनादायी कहाणी
जगात प्रत्येक मूर्तीची स्वत:ची एक अशी कहाणी असते. मूर्तिकार त्याला मेहनतीने आकार देत असतो. मूर्ती कुणाची आहे आणि का तसेच केव्हा निर्माण करण्यात आली याचीही कहाणी असते. अनेक मूर्ती खास घटनांच्या साक्षीदार असतात किंवा त्या घटनांमुळे निर्माण करण्यात आलेल्या असतात आणि याचमुळे त्या ऐतिहासिक ठरतात. इंग्लंडच्या ऑस्टवेस्टरीच्या ब्रिटिश आयरनवर्क सेंटरमध्ये एक मूर्ती खरोखरच वेगळी आहे. खऱ्याखुऱ्या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेल्या चाकूंद्वारे त्याची निर्मिती करण्यात आली आहे. यातील प्रत्येक चाकूची वेदनादायी कहाणी आहे.
या मूर्तीची निर्मिती एल्फी ब्रॅडले नावाच्या ब्रिटिश मूर्तिकाराने केली आहे. ‘नाइफ एंजेल’ नावाने प्रसिद्ध या मूर्तीला नॅशनल मॉन्यूमेंट अगेन्स्ट वॉयलेन्स अँड अॅग्रेशनही म्हटले जाते. या मूर्तीच्या निर्मितीत एकूण 1 लाख चाकू आणि ब्लेड्सचा वापर करण्यात आला आहे. ही मूर्ती चाकूंद्वारे होणारे गुन्हे आणि हिंसेच्या विरोधात एक शक्तिशाली प्रतीक ठरली आहे. तसेच अशा गुन्ह्यांमध्ये शिकार ठरलेल्या लोकांवर पडलेल्या प्रभावाची आठवण करून देणारी ही मूर्ती आहे.
चाकू जमा करण्यास लागली 10 वर्षे
ब्रॅडले यांना गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेले हे चाकू जमा करण्यास 10 वर्षांचा कालावधी लागला होता. ही मूर्ती 2018 मध्ये निर्माण झाली होती. यातील अनेक चाकू अशा नाइफ बँकेतील आहेत, ज्यात शिक्षामाफीनंतर लोक स्वत:ची ओळख जाहीर न करता चाकू जमा करत होते.
जागरुकता फैलावण्याचा उद्देश
या मूर्तीच्या निर्मितीचा उद्देश ब्रिटनमध्ये चाकूद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे आहे. याचबरोबर हिंसक वर्तन लोक आणि समुदायांवर किती वाईट प्रभाव पाडू शकते याची जाणीव युवांना करून देण्याचा हा प्रयत्न आहे. मूर्ती तयार करण्यासाठी सुमारे 5 कोटी 88 लाख रुपयांचा खर्च आला.
एका ठिकाणी ठेवलेली नाही
ही मूर्ती केवळ एकाच ठिकाणी स्थापित करण्यात आलेली नाही. याला ब्रिटनच्या अनेक हिस्स्यांमध्ये प्रदर्शित करण्यात आले. सध्या ही ऑस्टवेस्टरीच्या ब्रिटिश आयरनवर्क सेंटरमध्ये ठेवण्यात आली आहे. यापूर्वी ती स्कॉटलंडच्या पर्थ येथे ठेवण्यात आली होती. एकदा चाकू जमा झाल्यावर त्या सर्व चाकूंना विसंक्रमित करण्यात आले आणि मग सर्वप्रथम त्यांची धार हटविण्यात आली. यानंतर चाकूंना वितळवून स्टीलच्या संरचनेत चिकटविण्यात आले. काही चाकूंना स्टीलच्या प्लेट्सशी जोडत पंखाचा आकार देण्यात आला. याचबरोबर ब्रिटनमध्ये चाकूयुक्त गुन्ह्यांचे शिकार ठरलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मूर्तीवर संदेश कोरण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. एकूण 80 परिवारांनी पंखांवर लावलेल्या चाकूंवर स्वत:चे संदेश कोरले आहेत.









