बुडालेल्या 100 हून अधिक जणांचा शोध सुरू
वृत्तसंस्था/ अबुजा
उत्तर नायजेरियातील नायजर नदीत शुक्रवारी झालेल्या बोट दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला. तसेच 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. त्यापैकी बहुतांश महिला आहेत. ही बोट कोगी राज्यातील खाद्य बाजाराकडे जात असताना ती उलटली. अपघातसमयी सुमारे 200 लोक प्रवास करत असल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली. पाणबुड्यांद्वारे बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात असल्याचे आपत्कालीन सेवा एजन्सीच्या प्रवक्त्या सँड्रा मोसेस यांनी सांगितले. बोटीतील प्रवाशांच्या ओव्हरलोडमुळे हा अपघात झाल्याचे समजते. आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना चिंतेचा विषय बनत आहेत. नायजेरियाच्या दुर्गम भागांमध्ये रस्त्यांची सुविधा चांगली नसल्यामुळे अनेक लोक पर्यायी व्यवस्था म्हणून जल वाहतुकीला पसंती दर्शवितात. परिणामी पाण्यात बोटींचीही गर्दी झालेली दिसते. सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून अधिकाधिक प्रवाशांना घेऊन जाणे पसंत करतात. तसेच बोटींची जास्त गर्दी आणि देखभालीअभावी बहुतांश अपघात होतात. याव्यतिरिक्त उपलब्धता किंवा खर्चाच्या अभावामुळे अशा प्रवासामध्ये लाइफ जॅकेटचा वापर अनेकदा नाकारला जातो. नायजेरियाच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीच्या ऑपरेशन्सचे प्रभारी असलेल्या जस्टिन उवाझुरुओनी यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारच्या या बोट दुर्घटनेनंतर बचाव कर्मचाऱ्यांना जहाज शोधण्यासाठी काही तास संघर्ष करावा लागला.









