नवी दिल्ली : देशातील 27 राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सना मान्यता देण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडामंत्रालयाने घेतला असून तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सादर केले.
ज्यांना मान्यता दिली जाणार आहे त्यात बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, कुस्ती, हॉकी, जलतरण, सायकलिंग, नेमबाजी, टेबल टेनिस, स्क्वॅश, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी यांच्यासह अन्य काही फेडरेशन्सचा समावेश आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, ऍथलेटिक्स, मुष्टियुद्ध, गोल्फ यांच्यासह एकूण 13 फेडरेशन्सना प्रशासकीय निवडणूक या वर्षाच्या अखेरपर्यंत घेण्यास सांगण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने क्रीडा फेडरेशन्सना मान्यता देण्याचा आदेश क्रीडा मंत्रालयाला दिला होता. आणि या फेडरेशन्सना मान्यता देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या परवानगीची गरज नसल्याचेही त्यांनी त्यात म्हटले होते. क्रीडा मंत्रालयाने एकूण 57 क्रीडा फेडरेशन्सची मान्यता दिल्ली उच्च न्यायालयाच्या 24 जूनच्या आदेशानंतर रद्द केली होती.









