महिलांची एकमेव अॅशेस कसोटी : बेथ मुनी, हिली यांची अर्धशतके, इक्लेस्टोनचे 5 बळी
वृत्तसंस्था /नॉटिंगहॅम
यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघामध्ये येथे पहिल्यांदाच खेळविण्यात आलेल्या अॅशेस मालिकेतील एकमेव कसोटीत रविवारी खेळाच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला विजयासाठी 267 धावांचे आव्हान दिले आहे. खेळाच्या शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 257 धावांवर आटोपला. या एकमेव कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 124.2 षटकात 473 धावा जमविल्या. सदरलँडने नाबाद शतक (137), पेरीने 99, मॅकग्राने 61, गार्डनरने 40, मुनीने 33 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे इक्लेस्टोनने 5 गडी बाद केले. त्यानंतर इंग्लंडने आपल्या पहिल्या डावाला दमदार सुरुवात केली. आणि शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी त्यांचा पहिला डाव 463 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाला 10 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडच्या डावात ब्युमॉन्टने शानदार द्विशतक (208) झळकाविले. कर्णधार नाईट आणि नॅट स्किव्हेर ब्रंट यांनी अर्धशतके, वेटने 44 धावा जमविल्या. ब्युमॉन्टने 27 चौकारांसह 208 धावा जमवित ती शेवटच्या गड्याच्या रुपात बाद झाली. ऑस्ट्रेलियातर्फे गार्डनरने 4, मॅकग्राने 3, पेरी, सदरलँड आणि ब्राऊन यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
10 धावांची नाममात्र आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला चांगली सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाअखेर त्यांनी बिनबाद 82 धावा जमविल्या होत्या. बेथ मुनी 33 तर लिचफिल्ड 41 धावांवर खेळत होत्या. ऑस्ट्रेलियाने रविवारी खेळाला पुढे सुरुवात केली आणि इंग्लंडच्या क्रॉसने लिचफिल्डचा त्रिफळा उडविला. तिने 8 चौकारांसह 46 धावा जमविताना मुनी समवेत सलामीच्या गड्यासाठी 99 धावांची भागिदारी केली. लिचफिल्ड बाद झाल्यानंतर बेथ मुनी आणि पेरी या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 50 धावांची अर्धशतकी भागिदारी केली. इंग्लंडच्या फिलेरने पेरीचा त्रिफळा उडविला. तिने 2 चौकारांसह 25 धावा जमविल्या. फिलेरने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना मॅकग्राचा एका धावेवर त्रिफळा उडविला. उपाहारावेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 3 बाद 157 धावा जमवित इंग्लंडवर 167 धावांची आघाडी घेतली होती मुनी 9 चौकारांसह 73 तर जोनासेन 4 धावावर खेळत होत्या. इंग्लंडतर्फे फिलेरने 2 तर क्रॉसने 1 गडी बाद केला होता. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने आणखी 4 गडी गमाविताना 97 धावांची भर घातली. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 7 बाद 254 धावा जमविल्या होत्या. उपाहारानंतर इंग्लंडच्या इक्लेस्टोनने जोनासेनचा (14) त्रिफळा उडविला. इक्लेस्टोनने ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का देताना सलामीच्या मुनीला त्रिफळाचीत केले. मुनीने 168 चेंडूत 10 चौकारांसह 85 धावा जमविल्या. क्रॉसने ग्रार्डनरला एका धावेवर झेलबाद केले. तर इक्लेस्टोनने सदरलँडला वेटकरवी झेलबाद केले. तिने 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाची यावेळी स्थिती 7 बाद 198 अशी होती. अॅलिसा हिली आणि किंग यांनी संघाचा डाव सावरताना 8 व्या गड्यासाठी चहापानापर्यंत अभेद्य 56 धावांची भागिदारी केली.
चहापानानंतर काही वेळातच
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 257 धावांत आटोपला. अॅलिसा हिलीने 62 चेंडूत 6 चौकारांसह 50 धावा जमविल्या तर इक्लेस्टोनने ब्राऊनला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत करून ऑस्ट्रेलियाला 257 धावांवर गुंडाळले. इंग्लंडच्या इक्लेस्टोनने 63 धावांत 5, क्रॉस व फिलेर यांनी प्रत्येकी 2, बेलने एक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव 124. 2 षटकात सर्व बाद 473, इंग्लंड प. डाव 121. 2 षटकात सर्व बाद 463 (ब्युमॉन्ट 208, नाईट 57, नॅट स्किव्हेर ब्रंट 78, वेट 44, गार्डनर 4-99, मॅकग्रा 3-24, ब्राऊन 1-78, सदरलँड 1-78, पेरी 1-39),
ऑस्ट्रेलिया महिला दु. डाव 78.5 षटकात सर्व बाद 257 (मुनी 85, लिचफिल्ड 46, पेरी 25, मॅकग्रा 1, जोनासेन 14, सदरलँड 15, गार्डनर 1, हिली 50, किंग 9, अवांतर 11, फिलेर 2-49, क्रॉस 2-73, इक्लेस्टोन 5-63, बेल 1-27).









