लवकरच वितरण, दुरुस्तीलाही होणार प्रारंभ : जिल्ह्यात 14 लाख 70 हजार 18 रेशनकार्डधारक
बेळगाव : जिल्ह्यात रेशनकार्ड वितरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र अद्यापही 26 हजार 687 लाभार्थ्यांची रेशनकार्डे प्रलंबित आहेत. लवकरच रेशनकार्डे वितरित करण्यात येणार आहेत. शासनाच्या गॅरंटी योजनांमुळे रेशनकार्डची मागणी वाढली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रेशनकार्ड वितरणाचे काम स्थगित करण्यात आले होते. जिल्ह्यात एकूण 14 लाख 70 हजार 18 रेशनकार्डधारक आहेत. यामध्ये बीपीएलकार्डधारकांची संख्या मोठी आहे. दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांना बीपीएल आणि अंत्योदय कार्डांची पूर्तता केली जाते. सरकारच्या गॅरंटी योजनांसाठी बीपीएल रेशनकार्डची मागणी वाढली आहे. त्यामुळे बीपीएलसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात 3 लाखाहून अधिक लाभार्थ्यांनी बीपेएलसाठी अर्ज केले आहेत. त्यातील काही लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांसाठी प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेस सरकारने निवडणुकीदरम्यान अन्नभाग्य योजनेंतर्गत दहा किलो तांदूळ पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुरेशा तांदूळसाठ्याअभावी निधी दिला जात आहे. सद्यस्थितीत माणसी पाच किलो तांदूळ आणि प्रतिव्यक्ती 170 रुपयेप्रमाणे निधी वितरित होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बीपीएल आणि अंत्योदय रेशनकार्डांची मागणी वाढली आहे. मात्र रेशनकार्ड वितरणाचे काम सुरळीत सुरू नसल्याने लाभार्थ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.
रेशनकार्ड दुरुस्तीही लांबणीवर
अनेक लाभार्थ्यांच्या रेशनकार्डमध्ये दुरुस्ती असल्याने शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. ऑक्टोबर महिन्यात दुरुस्तीसाठी तीन दिवस मुदत देण्यात आली होती. मात्र सर्व्हरडाऊनच्या समस्येमुळे कामात व्यत्यय निर्माण झाला. त्यामुळे अनेकांना रेशनकार्ड दुरुस्तीपासून दूर रहावे लागले. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये रेशनकार्ड दुरुस्तीसाठी मुदत दिली जाणार का? याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
अर्ज केलेल्या सर्व लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वितरण होणार
रेशनकार्ड वितरणाला प्रारंभ झाला आहे. अद्यापही 26 हजार 687 बीपीएल रेशनकार्डे प्रलंबित आहेत. ती लवकरच वितरित केली जाणार आहेत. अर्ज केलेल्या सर्व लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वितरण केले जाणार आहे.
– श्रीशैल कंकणवाडी,सहसंचालक अन्न व नागरी पुरवठा खाते









