‘इंडिया’ची पुढील बैठक मुंबईत होणार, पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचा नसणार हट्ट
वृत्तसंस्था/ बेंगळूर
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत या नावाची घोषणा केली आहे. ‘इंडिया’च्या समन्वयासाठी 11 सदस्यांची समिती आणि एक कार्यालय लवकर स्थापन केले जाणार आहे. यासंबंधीची घोषणा मुंबईत होणाऱ्या आगामी बैठकीत होईल असे खर्गे यांनी सांगितले आहे. खर्गे यांनी यावेळी पत्रकारांकडून समान नागरी संहितेविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला स्पष्ट उत्तर देणे टाळले आहे.
भाजपने लोकशाहीच्या सर्व यंत्रणा ईडी, सीबीआय इत्यादींचा गैरवापर चालविला आहे. बैठकीसाठी जमलेल्या पक्षांमध्ये राजकीय मतभेद आहेत, परंतु आम्ही देश वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. यापूर्वी आम्ही पाटणा येथे जमलो होतो, तेव्हा 16 पक्षांचा सहभाग होता. तर आजच्या बैठकीत 26 पक्षांनी भाग घेतला आहे. तर रालोआ 36 पक्षांसोबत बैठक घेत आहेत, यातील पक्ष नोंदणीकृत आहेत की नाही हे मला माहित नसल्याचे म्हणत खर्गे यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.
आम्ही येथे स्वत:चे हित जपण्यासाठी नव्हे तर देशाला वाचविण्यासाठी एकत्र आलो आहोत. सरकारचे अपयश ठळकपणे जनतेसमोर आणणे हे आमचे लक्ष्य आहे. राहुल गांधी, ममता बॅनर्जी सर्व सहमत असल्याने मी आनंदी आहे. 2024 मध्ये आम्ही एकत्र लढू आणि विजय मिळवू असे खर्गे म्हणाले.

देशात दलित, हिंदू, मुस्लीम प्रत्येकाचे जीवन धोक्यात आहे. दिल्ली, बंगाल, मणिपूर असो केवळ सरकार विकणे आणि खरेदी करणे हेच काम सरकारचे काम ठरले आहे. आमच्या आघाडीचे नाव इंडिया आहे, भाजप इंडियाला आव्हान देणार का असे उद्गार ममता बॅनर्जी यांनी काढले आहेत.
9 वर्षांमध्ये केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्राला उद्ध्वस्त केले आहे. विमानतळ, विमान, आकाश, जमीन आणि पाताळ सर्वकाही भाजप सरकारने विकले आहे. भाजप सरकारमुळे शेतकरी, व्यापार सर्वच वर्ग दु:खी आहेत. देशात फैलावल्या जाणाऱ्या द्वेषापासून देशाला वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
देशाचा आवाज सध्या दडपला जात आहे. ‘इंडिया’ हे नाव लढाई एनडीए अणि इंडियादरम्यान असल्यानेच निवडले आहे. ही लढाई मोदी आणि इंडिया दरम्यान आहे. जेव्हा कुणी इंडिया विरोधात उभा ठाकतो तेव्हा विजय कुणाचा होतो हे सर्वांनाच माहित आहे. भारताच्या विचारावर आक्रमण होत आहे. हे आक्रमण भाजप करत आहे. देशात बेरोजगारी वाढत असून मोदींचे निकटवर्तीय असलेल्या अब्जाधीशांना लाभ होतोय असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
‘इंडिया’त सामील पक्ष
काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, शिवसेना (यूबीटी), राजद, संजद, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, झामुमो, आम आदमी पक्ष, माकप, भाकप, केडीएमके, व्हीसीके, आरएसपी, माकप-माले, फॉरवर्ड ब्लॉक, आययुएमएल, केरळ काँग्रेस (जोसेफ), केरळ काँग्रेस (मणि), अपना दल (कामेरावादी), मणिथानेला मक्कल काची, एआयएफबी, रालोद
‘इंडिया’ची पुढील बैठक मुंबईत होणार
भाजपच्या विरोधातील पक्षांची मंगळवारी बेंगळूर येथे बैठक झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आयोजित या बैठकीत 26 पक्षांनी भाग घेतला आहे. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. इंडिया म्हणजेच इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्स असे नाव असणार आहे. इंडियाचे कार्यालय नवी दिल्ली येथे स्थापन केले जाणार आहे.
आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद : खर्गे
राज्यस्तरावर आम्हा पक्षांदरम्यान काही मतभेद असल्याचे आम्ही जाणून आहोत. परंतु हे मतभेद मागे सोडून लोकांकरता वाटचाल न करण्याइतके मोठे नाहीत. देशातील प्रत्येक संस्थेला विरोधी पक्षांच्या विरोधात अस्त्र म्हणून वापरले जात आहे. या बैठकीच्या आयोजनामागे आमचा उद्देश घटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचे रक्षण करणे असल्याचे दावा खर्गे यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ताळमेळ नाही
माकपचे महासचिव सीताराम येच्युरी यांनी बैठक संपताच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीतील ऐक्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये अलिकडेच पार पडलेल्या स्थानिक निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांकडून डावे पक्ष, काँग्रेस तसेच भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे.
‘इंडिया’त सहभागी नवे पक्ष
या बैठकीसाठी विरोधी पक्षांच्या गोटाला अधिक मजबूत करण्याकरता आणखी 8 पक्षांना निमंत्रित करण्यात आले होते. यात मरुमलारची द्रविड मुनेत्र कडगम (एमडीएमके), कोंगु देसा मक्कल काची (केडीएमके), विदुथलाई चिरुथिगल काची (व्हीसीके), रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययुएमएल), केरळ काँग्रेस (जोसेफ) आणि केरळ काँग्रेस (मणि) यांचा समावेश आहे.
काँग्रेसने पंतप्रधानपदाचा मोह त्यागला
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी महाआघाडी निर्माण करत मोदी सरकारला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 26 पक्ष एकजूट झाले आहेत. भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी काँग्रेसने पंतप्रधानपदाचा मोह सोडला असल्याचे समजते. यासंबंधीची घोषणा बेंगळूरमधील बैठकीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे याहंनी केल्याचे सांगण्यात आले.काँग्रेसचा सध्या एकसूत्री अजेंडा केवळ आणि केवळ मोदी सरकारला सत्तेवरून हटविणे आहे. याकरता काँग्रेस कुठलाही त्याग करण्यास तयार आहे.
काँग्रेस अध्यक्षांच्या या घोषणेनंतर आता राहुल गांधी अन् प्रियांका वड्रा हे पंतप्रधानपदासाठीचे दावेदार नसतील तर महाआघाडीचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सध्या नितीश कुमार, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांचे नाव या पदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जाते.
आमच्या महाआघाडीचे देशातील 11 राज्यांमध्ये सरकार आहे. याचमुळे आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू शकतो असे म्हणत खर्गे यांनी सहकारी पक्षांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने 303 जागा या घटक पक्षांच्या मदतीने जिंकल्या होत्या. परंतु सत्ता मिळाल्यावर भाजपने या पक्षांना दूर केले. काँग्रेस असे करणार नाही असा दावा खर्गे यांनी केला आहे.
प्रथम एकत्र लढुया
महाआघाडीच्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सध्या निवडणुकीपूर्वी कुठल्याही नेत्याला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाहू इच्छित नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही महाआघाडी म्हणून निवडणूक लढलो तर कमीतकमी 350 जागा जिंकू शकतो असे नितीश यांनी म्हटले आहे. नितीश यांनी एकप्रकारे पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केल्यास महाआघाडीत फूट पडू शकते असा इशारा दिला आहे. नितीश कुमार हे स्वत: पंतप्रधानपदासाठी इच्छुक असल्याचे मानले जाते.
हुकुमशाहीच्या विरोधात एकजूट
विरोधी पक्षांची बैठक संपल्यावर आयोजित सभेला शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. आमची दुसरी बैठक पार पडली आहे. हुकुमशाहीच्या विरोधात जनता एकजूट होत आहे. काही जण आम्ही परिवारासाठी लढत आहोत असे म्हणत आहेत. होय, आम्ही परिवारासाठी लढत आहेत, कारण देशच आमचा परिवार आहे. या परिवाराला वाचवायचे आहे. काही लोक बैठकीत सामील पक्षांची विचारसरणी वेगळी असल्याचे म्हणतात, हीच तर खरी लोकशाही आहे. वेगवेगळी विचारसरणी असूनही आम्ही एकत्र आलो आहोत, कारण ही लढाई कुणा व्यक्ती किंवा पक्षाविरोधात नाही, तर हुकुमशाही विरोधात आहे. भविष्यात काय होणार याची भीती देशाच्या जनतेत आहे. घाबरू नका आम्ही आहोत असा विश्वास देशाच्या जनतेला देऊ इच्छितो. एक व्यक्ती किंवा पक्ष म्हणजे देश नाही. आम्ही आमच्या देशाला सुरक्षित ठेवू असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
‘इंडिया’ नावावर नितीश यांचा आक्षेप
विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ हे नाव मिळाले आहे. परंतु हे नाव संजद अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पसंत पडले नसल्याचे समजते. नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीत ‘इंडिया’ हा शब्द ‘एनडीए’सारखाच आहे. यामुळे दुसरे नाव सुचविण्यात यावे अशी भूमिका नितीश यांनी मांडली होती. परंतु राहुल गांधी यांनी याच नावाचा आग्रह धरल्याने नितीश यांनी नाईलाजास्तव हमी दर्शविली आहे.









