मुंबईहून गोव्याला निघालेल्या कंत्राटदाराच्या कारमध्ये आढळली रक्कम
प्रतिनिधी/ बेळगाव
मुंबईहून गोव्याला निघालेल्या एका कंत्राटदाराच्या कारमधून 26 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री पिंपळकट्ट्याजवळ मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली असून प्राप्तिकर विभागाकडे हे प्रकरण सोपविण्यात आले आहे. पत्नीबरोबरच्या भांडणानंतर हा कंत्राटदार मोठी रक्कम घेऊन गोव्याला निघाला होता.
मुंबई येथील एक कंत्राटदार आपल्या कारमधून गोव्याला निघाला होता. यासाठी त्याने गुगल मॅपची मदत घेतली होती. गुगल मॅप बघत पिंपळकट्टामार्गे खानापूर रोडला जाताना पोलीस व निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची कार अडवून तपासणी केली असता 26 लाख रुपये आढळून आले.
मार्केटचे पोलीस निरीक्षक पौल प्रियकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या कंत्राटदाराकडे कारमध्ये आढळलेल्या रकमेविषयी चौकशी केली असता ही रक्कम आपलीच असून आपण मुंबईत कंत्राटदार आहोत. गोव्याला निघालो होतो. ऑनलाईन ट्रांझक्शनमुळे आपण कोठे आलोत हे कोणाला कळू नये म्हणून ही रक्कम घेऊन चाललो होतो, अशी माहिती त्याने तपास अधिकाऱ्यांना दिली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी दुचाकीच्या डिकीत 13 लाख रुपये याच पिंपळकट्टा परिसरात जप्त करण्यात आले होते. यापाठोपाठ शुक्रवारी रात्री कारमधून 26 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पुढील चौकशीसाठी हे प्रकरण प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रवाशांकडून 3 लाख रुपये जप्त
बेंगळूरहून आराम बसमधून पुण्याकडे निघालेल्या एका प्रवाशाच्या बॅगमधून 3 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवारी हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ पोलीस निरीक्षक अमरेश बी. व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.









