परिवहन महामंडळला दिलासा : विविध मार्गांवर बससेवा सुसाट
बेळगाव : गणेशोत्सव काळात विविध मार्गांवर धावलेल्या जादा बसमधून परिवहनला 25 लाख 77 हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या परिवहनला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे, मुंबई आणि बेंगळूर मार्गावर जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. परिवहनने प्रवाशांच्या सोयीखातर दि. 3 ते 12 सप्टेंबरदरम्यान जादा बसेसची सोय केली होती. गणेशोत्सव काळात मूळ गावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. दरम्यान, या काळातच परिवहनने अधिक बसची व्यवस्था केली होती. सामान्य बसबरोबर वातानुकूलित बसेसही सोडल्या होत्या. या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात परिवहनला अतिरिक्त 26 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीपासून शक्ती योजनेंतर्गत महिला प्रवाशांचा मोफत प्रवास सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळातील अतिरिक्त बससेवेला महिला प्रवाशांची संख्याही अधिक होती. त्यामुळे साहजीकच उत्पन्नात भर पडली आहे. परिवहनने ऑनलाईन तिकीट बुकिंगसेवाही सुरू केली आहे. यासाठी अॅपची निर्मिती केली आहे. त्यामुळे घरबसल्या बसचे तिकीट बुकिंग होऊ लागले आहे. या सेवेलाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे.
शक्ती योजनेमुळे प्रवाशांची वाढ
गणेशोत्सव काळात मुंबई, पुणे आणि बेंगळूर मार्गावर अतिरिक्त 49 बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बससेवेतून 25 लाख 77 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्याही वाढली आहे.
-के. के. लमाणी, डीटीओ









