इस्लामपूर प्रतिनिधी
ऊस वाहतुकीसाठी मजूर पुरवण्याचे अमिष दाखवून तीन मुकादमांनी वाळवा तालुक्यातील हुबालवाडी व नवेखेडच्या ऊस वाहतूकदारांची 26 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी या वाहतुकदारांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.
सुभाष भिमराव नांगरे (49 रा. हुबालवाडी),उत्तम भगवान हुबाले (37 रा. हुबालवाडी) व धनाजी तम्मा मोकाशी (40 रा. नवेखेड) अशी फसवणूक झालेल्या मुकादमांची नावे आहेत. हे तिघेही शेतकरी असून जोड व्यवसाय म्हणून ऊस कारखान्यास ट्रॅक्टरने ऊस वाहतूक करतात. नांगरे यांनी सन 2021 मध्ये सन 2021-22 च्या गळीत हंगामासाठी हुतात्मा कारखान्यासाठी ट्रॅक्टर लावला होता. त्यासाठी मजूर मिळावेत म्हणून लालू नरसिंग चव्हाण (34 रा.सोमदवर हट्टी, सिदापूर, विजयपूरा, जि. विजापूर) या मुकादमास 9 पुरुष व 9 महिला मजुरांसाठी करार करुन ऑनलाईन व रोख स्वरुपात 10 लाख रुपये दिले. मात्र चव्हाण याने मजूर न पुरवून फसवणूक केली.
हुबाले यांनी ही सन 2018-19 च्या गळीत हंगामासाठी फत्तू भिल्लू राठोड (28 रा. टक्कळगी, तांडा, ता. विजापूर) यास मजुरांसाठी 9 लाख रुपये दिले. त्याने ही मजूर न पुरवता, फसवणूक केली. नवेखेडच्या मोकाशी यांनी सन 2023 च्या गळीत हंगामासाठी मुकादम देवीदास तोताराम भिल (38, मुळ रा. शहदा मदाने, नंदुरबार सध्या रा. रुदावली ता. शिरपूर जि. धुळे) यास 11 पुरुष व 11 महिला मजुरांसाठी 7 लाख 10 हजार रुपये दिले होते. त्यानेही या हंगामात मजूर पुरवले नाहीत, आणि घेतलेली रक्कम ही परत केली नाही, या प्रकरणी अधिक तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.








