बीजिंग
कोरोनाने सर्वच देशांचे मध्यंतरी कंबरडे मोडले होते. भारत अमेरिका, इंग्लंडसह अन्य देशांना झटका देणाऱया कोरोना विषाणुच्या प्रसारामागचे कारण जाणुन घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने 26 जणांचे तज्ञ सल्लागार पथक नेमले असल्याचे समजते. सदरचे पथक चीनमध्ये जाऊन कोरोना प्रसाराचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. सदरचा प्रयत्न आता शेवटचा असणार असल्याचे समजते. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका सदस्यांच्या पथकाने या वर्षाच्या सुरूवातीला चीनमधील वुहान शहरात 4 आठवडे राहून कोरोनामागचा तपास केला होता. पण त्यावेळी त्यांना कोणत्याही ठोस पुराव्याअभावी रिकामे परतावे लागले होते. अमेरिकेने याआधी वुहानवरच संशय स्पष्ट केला आहे. याखेपेस चीनला सुरूवातीच्या कोरोना प्रकरणांचा अहवाल सोपवण्याची विनंती करण्यात आली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. त्याला सरकार कसा प्रतिसाद देते यावरून तपासाची दिशा ठरेल. जगाची व्यवस्था कोसळवणाऱया कोरोनाचे मूळ शोधण्याचा हा जागतिक आरोग्य संघटनेचा शेवटचा प्रयत्न असू शकतो. डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता.









