प्रतिनिधी/ बेळगाव
कामानिमित्त कर्नाटकामध्ये अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी नैर्त्रुत्य रेल्वेने पार पाडली आहे. एकूण 256 श्रमिक एक्स्प्रेस रेल्वेंमधून 3 लाख 75 हजार श्रमिकांना गावापर्यंत सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर 136 पार्सल रेल्वेमधून जीवनावश्यक साहित्य, औषधे यांची वाहतूक करण्यात आली आहे.
कर्नाटकातून बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड, ओडिशा, राजस्थान, मध्यप्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, मणिपूर, छत्तीसगड, हिमाचाल प्रदेश, केरळ, मिझोरम, नागालँड या शहरांमधील मजुरांना त्यांच्या गावांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. बिहारमध्ये 79 रेल्वेंमधून 1 लाख 16 हजार, उत्तर प्रदेशला 56 रेल्वेंमधून 81 हजार 67 मजुरांना त्यांच्या गावांपर्यंत सोडण्यात आले.
नैर्त्रुत्य रेल्वेच्या म्हैसूर, बेंगळूर, हासन, हुबळी, होसपेट, बळ्ळारी, कोप्पळ, होसूर या शहरांमधून लॉकडाऊनच्या काळात या श्रमिक स्पेशल रेल्वे सोडण्यात आल्या. एकूण 3 लाख 76 हजार मजुरांना त्यांच्या गावांपर्यंत सोडण्यात आले. यावेळी त्यांना रेल्वेकडून जेवण, खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात आल्या.
136 पार्सल रेल्वेमधून साहित्याची वाहतूक
लॉकडाऊनच्या काळात रस्ते वाहतूक बंद असल्यामुळे जीवनावश्यक साहित्य व औषधांचा तुटवडा जाणवत होता. या काळात नैर्त्रुत्य रेल्वेने विशेष पार्सल रेल्वे सोडल्या. या रेल्वेमधून औषधे, दूध, भाजीपाला, फळे, मासे, मटण, सुके खोबरे, मिरची यांची कर्नाटकातून वाहतूक करण्यात आली. या रेल्वेंमधून 11 हजार 209 टन साहित्याची वाहतूक करण्यात आली.









