245 मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द
► वृत्तसंस्था/ अहमदाबाद
गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 251 जणांचे डीएनए त्यांची ओळख पटविण्यासाठी वापरण्यात आले आहेत. 245 जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आल्याची माहिती अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. राकेश जोशी यांनी दिली. अन्य 6 मृतदेह ब्रिटनमधील रहिवासी कुटुंबांचे आहेत. हे मृतदेह लवकरच त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे, अहमदाबादमध्ये विमानाचा ढिगारा हलवतानाही एक अपघात झाला. विमानाचे अवशेष ट्रकमधून नेण्यात येत असताना विमानाचा मागील भाग झाडाला अडकल्यामुळे शाहीबाग डफनाळा ते कॅम्प हनुमान मंदिर असा रस्ता दोन तास बंद करावा लागला. पोलीस आणि अग्निशमन दल विभागाने झाडाच्या फांद्या तोडून ट्रकला मार्गस्थ केले. अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे विमान 12 जून रोजी कोसळले होते. या अपघातात विमानात असलेल्या 242 पैकी 241 जणांसह 270 जणांचा मृत्यू झाला. विमानातील एक व्यक्ती बचावली आहे. विमान मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर धडकल्यामुळे या अपघातात केवळ प्रवासीच मृत्युमुखी पडले नाहीत तर अहमदाबाद मेडिकल कॉलेजच्या काही डॉक्टरांचाही मृत्यू झाला होता.









