आवक वाढत राहिल्यास आणखी 5 हजार क्युसेक सोडणार : नागरिकांना सतर्कतेचा इशारा
बेळगाव : मार्कंडेय जलाशय क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मार्कंडेय जलाशयात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत असून आवकही वाढली आहे. यामुळे गुरुवार दि. 17 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून 2500 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पण जलाशयात आवक वाढतच राहिल्यास आणखी 5 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून जनावरे व जीवनावश्यक साहित्यासह सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मार्कंडेय जलाशय क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नद्या तुडुंब वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. शासनाकडून निवारा केंद्रांची स्थापना करण्यात आली असून प्रसंगी नागरिकांना तेथे स्थलांतरित होता येणार आहे. मार्कंडेय धरण भागात पाऊस होत असल्याने पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे जलाशय 98.10 टक्के भरले असून जलाशयातील आवकमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. जलाशयाची कमाल पाणीपातळी 2309.71 इतकी असून गुरुवार दि. 17 रोजी सकाळी 11.30 वाजता जलाशयाची पाणीपातळी 2308.98 इतकी होती. तसेच जलाशयामध्ये 2441 क्युसेकची आवक होत असल्याने गुरुवारी दुपारी 3 पासून 2500 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पण जलाशयात आवक वाढतच राहिल्यास आणखी 5 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.









