कराड / देवदास मुळे :
राज्यातील चार वर्षे रखडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्याची तयारी शासन आणि निवडणूक आयोगाकडून सुरू करण्यात आली आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. याचाच एक भाग म्हणून सातारा जिह्यातील निवडणूक होऊ घातलेल्या नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीची सदस्य संख्या व आरक्षण प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन पुणे यांनी निश्चित केली आहे. त्यानुसार सातारा जिह्यातील 10 पालिकांमधून सुमारे 250 नगरसेवक निवडून जाणार आहेत. सातारा नगरपालिकेत आरक्षण वगळता 14 जागा खुल्या असून या जागांवर तीव्र चुरस पाहायला मिळणार आहे. तर कराडमध्ये 9 जागा खुल्या राहणार आहेत.
नगरपरिषद प्रशासन पुणे प्रादेशिक सहसंचालक डॉ. चंद्रकांत पुलपुंडवार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. 2011 सालच्या जनगणनेच्या आधारे ही सदस्य संख्या व आरक्षण निश्चित करण्यात आली आहे. हद्दवाढीनंतर सातारा नगरपालिकेची लोकसंख्या 1 लाख 80 हजार 568 इतकी झाली आहे. या लोकसंख्येनुसार सातारा येथे गत पालिका निवडणुकीच्या 40 जागांच्या तुलनेत यावेळी 10 नगरसेवकांची वाढ झाली आहे. सातारा पालिकेत 50 पैकी 25 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. यात सर्वसाधारण महिलांसाठी 15 जागा निश्चित झाल्या असून अनुसूचित जाती महिलेसाठी 3 जागा तर ओबीसी महिलेसाठी 7 जागा निश्चित झाल्या आहेत. अनुसूचित जाती खुला 3, अनुसूचित जमाती 1, ओबीसी खुला 7 अशा एकूण 36 जागा राखीव झाल्या असून 14 जागा खुल्या असणार आहेत. दिग्गजांना या 14 जागांवरून निवडून यावे लागणार आहे.
- कराडमध्ये दोन नगरसेवक वाढणार
कराडमध्ये गत निवडणुकीत 29 जागा होत्या. लोकसंख्येनुसार यात दोनने वाढ झाली आहे. एकूण 31 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. यातील 16 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. यात सर्वसाधारण महिला 10, अनुसूचित जाती महिला 2, ओबीसी महिला 4 असणार आहेत. शिवाय अनुसूचित जाती खुला 2 व ओबीसी खुला 4 जागा असणार आहेत. एकूण 22 जागा राखीव झाल्या असून 9 जागा खुल्या असणार आहेत.
मलकापूर नगरपालिकेत एकूण 22 सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. फलटणमध्ये नगरसेवक संख्या 25 वरून 27 झाली आहे. वाईमध्ये 3 जागा वाढल्या असून 23 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. पाचगणी, रहिमतपूर व म्हसवडमध्येही जागा वाढल्या असून प्रत्येकी 20 नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.
सद्या शासनाकडून नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू आहे. सदस्य संख्या निश्चित झाल्यानंतर प्रारूप प्रभाग रचना 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान प्रसिद्ध होणार आहे. तर अंतिम प्रभाग रचना 26 ते 30 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहेत. त्यानंतर प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर होईल. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यानंतर नगरपालिका निवडणुकांची घोषणा होईल. नगरपालिकांच्या निवडणुका दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने तर नगरपंचायतींच्या निवडणुका एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत.
- अशा असतील राखीव जागा
नगरपालिका एकूण सदस्य अनुसूचित जाती अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती ओबीसी ओबीसी महिला सर्वसाधारण महिला
सातारा 50 3 3 1 7 7 15
कराड 31 2 2 0 4 4 10
फलटण 27 2 3 0 3 4 7
वाई 23 1 1 1 3 3 7
महाबळेश्वर 20 1 1 1 2 3 6
पाचगणी 20 2 2 0 2 3 5
म्हसवड 20 1 2 0 2 3 5
रहिमतपूर 20 1 1 0 2 3 6
मलकापूर 22 1 2 0 3 3 6
मेढा 17 1 1 1 2 3 4








