अर्थसंकल्पात घोषणा
2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 25 हजार किलोमीटरने वाढविण्याची घोषणा मंगळवारी केली आहे. पुढील आर्थिक वर्षात प्रवासी तसेच मालवाहतुकीला वेग देण्यासाठी एक्स्प्रेसवेंकरता पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅन अंमलात आणला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गांचे जाळे पुढील आर्थिक वर्षात 25 हजार किलोमीटरने वाढविले जाणार आहे. नव्या मार्गांद्वारे 20 हजार कोटींचा निधी उभारून हे प्रकल्प पूर्ण केले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
युनिफाइड लॉजिस्टिक्स इंटरफेस प्लॅटफॉर्मवर (युएलआयपी) सर्व प्रकारच्या वाहतूक ऑपेरटर्सकडून डाटाची देवाणघेवाण होणार आहे. ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) करता हा प्लॅटफॉर्म डिझाइन करण्यात आला आहे. या नव्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने विविध मार्गांनी होणाऱया मालवाहतुकीला वेग देण्यास मदत होणार आहे. तसेच मालवाहतुकीचा खर्च तसेच वेळ कमी करता येणार आहे. इन-टाइम इन्व्हेंटरी मॅनेजमेंटला यातून सहाय्य होणार असून अनावश्यक कागदी प्रक्रिया टाळता येणार आहे. तसेच मालवाहतुकीशी संबंधित घटकांना प्रत्यक्ष वेळेत माहिती मिळणार असून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मकता सुधारण्यास मदत मिळणार असल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या.
प्रवाशांच्या सिमलेस ट्रव्हलचे नियोजन करण्यासही यातून सुलभता येणार आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात चार ठिकाणी पीपीपी म्हणजेच सार्वजनिक-खासगी भागीदारीतून मल्टीमोडल लॉजिस्टिक्स पार्क्सच्या निर्मितीकरता पावले उचलली जाणार आहेत. केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकार आणि त्यांच्या पायाभूत सुविधा विषयक यंत्रणांचे कौशल्य वाढविण्यासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनकडून तांत्रिक सहाय्य घेतले जाणार आहे. यामुळे पीएम गतिशक्ती पायाभूत प्रकल्पांच्या प्लॅनिंग, डिझाइन, वित्तपुरवठा आणि अंमलबजावणी व्यवस्थापनाला मोठा वेग येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









