मुख्यमंत्र्यांसह सरकारमधील आमदारांची मुर्मू यांनी घेतली भेट
प्रतिनिधी / पणजी
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना गोव्यातील भाजप आघाडी सरकारमधील पंचवीसही आमदारांनी आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. श्रीमती मुर्मू यांनी गुरुवारी दुपारी गोव्याला भेट दिली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सरकारातील सर्व आमदारांची भेट घेतली. त्यावेळी सर्व घटकांनी त्यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.
येथील एका हॉटेलमध्ये आयोजित छोटेखानी समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो, सभापती रमेश तवडकर, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेटतानावडे यांनी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी सर्वांनी एकत्रपणे आपला पाठिंबा जाहीर केला. भाजपचे सर्व मंत्री व सर्व आमदार यावेळी उपस्थित होते.
मगो व अपक्षांचाही पाठिंबा
मगो नेते व वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता, मगो पक्षाने आपला पूर्ण पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना जाहीर केल्याचे ते म्हणाले. मगोचे दोन्ही आमदार मुर्मू यांना मतदान करणार, असे त्यांनी सांगितले. डॉ. चंद्रकांत शेटय़े, आलेक्स रेजिनाल्ड आणि अँथनी वास या तिन्ही अपक्ष आमदारांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला.
दुपारी द्रौपदी मुर्मू या गोव्यात आल्या. यावेळी राज्याचे शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळावर त्यांचे स्वागत केले.









