विरोधी गटातील नगरसेवकांची आमदार राजू सेठ यांनी घेतली बैठक
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी आपल्या निधीतून महानगरपालिकेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांना व विरोधी गटामध्ये सामील झालेल्या अपक्ष नगरसेवकांना विकासासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. आमदार राजू सेठ, महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या उपस्थितीत महापालिकेमध्ये बैठक झाली. त्यामध्ये आमदार राजू सेठ यांनी ही माहिती दिली. आमदार राजू सेठ यांनी पालिकेतील विरोधी गटातील नगरसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बेळगाव महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये 40 लाख रुपये निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीच प्रक्रिया झाली नाही. त्यामुळे आम्ही सर्व नगरसेवक अडचणीत आलो आहे. कोणताही विकास होत नसल्याने जनता आम्हाला विविध विकासकामांबाबत विचारणा करत आहे. तेव्हा आम्हाला स्वतंत्र निधी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. पालकमंत्र्यांनी याबाबत आश्वासन दिले असल्याचे आमदार सेठ यांनी यावेळी सांगितले. तुम्ही सर्वांनी यासाठी योग्य ते नियोजन करा, जी विकासकामे करायची आहेत त्याबाबत संपूर्ण आराखडा तयार करून ठेवा, असेही सांगण्यात आले. यावेळी बैठकीमध्ये सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त केवळ कन्नड भाषेमधून दिले जात आहे. त्यामुळे आम्हाला समस्या निर्माण होत आहेत. त्यावर तिन्ही भाषेतून इतिवृत्त देण्याची सूचना आमदार राजू सेठ यांनी महापालिका आयुक्तांना केली. या बैठकीला विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी, नगरसेवक रवी साळुंखे, अजिम पटवेगार, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे सचिव मल्लगोंडा पाटील यांच्यासह उपायुक्त उदयकुमार तळवार आदी उपस्थित होते.









