मतदानाच्या दिवशी पाठविल्या होत्या 140 बसेस
पणजी : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यातील कदंब परिवहन महामंडळाच्या बसगाड्या पाठवून महामंडळाने सुमारे 25 लाख ऊपयांचे उत्पन्न प्राप्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्या गाड्या भाडेपट्टीवर देण्यात आल्या होत्या. कर्नाटकातील गोव्यात राहाणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी तेथे जाण्यासाठी कदंबने बसेसची सोय केली होती. कदंबच्या 140 बसेस तेथे पाठवल्या होत्या. त्या फुकट नव्हे तर त्याचे भाडे वसूल झाले असून सुमारे 25 लाखांची भर कदंबच्या तिजोरीत पडल्याचे सांगण्यात आले. या कदंबच्या बसगाड्या कर्नाटकात पाठवल्या म्हणून काँग्रेस, आरजी व इतर विरोधी पक्षांनी सरकारवर, कदंबवर टीकेची झोड उठवली होती. गोव्यातील जनतेचे, प्रवाशांचे हाल करण्यात धन्यता मानून कदंबच्या बसगाड्या कर्नाटकात वळवल्या असाही आरोप करण्यात आला होता. कदंब महामंडळाने काही खासगी बसगाड्याही कर्नाटकात जाण्यासाठी उपलब्ध कऊन दिल्या होत्या, अशी माहिती मिळाली आहे. मागील मे महिन्यात 10 तारखेला कर्नाटकात विधानसभेसाठी मतदान झाले. त्यावेळी कदंबच्या नियमित मार्गावरील बसगाड्या तिकडे वळवण्यात आल्या नव्हत्या तर शाळेसाठी असलेल्या कदंबच्या बसेस तिकडे नेण्यात आल्या होत्या. शाळा परीक्षा झाल्याने बंद होत्या, तेव्हा त्यांच्या वापरात असलेल्या बसगाड्याही बंद होत्या. त्याच बसगाड्या कर्नाटकात नेण्यात आल्याचा खुलासा कदंबने केला होता. आता त्या बसेसमधून 25 लाखांचे उत्पन्न मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे.









