वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
बुडापेस्ट येथे नुकत्याच झालेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पुरूषांच्या भालाफेक प्रकारात पाचवे स्थान मिळविणारा किशोर जेनाला ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी 25 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. ओडिसा राज्यातून विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकारात अंतिम फेरी गाठत भारताचे प्रतिनिधीत्व करणारा किशोर जेना हा पहिला अॅथलिट आहे. या स्पर्धेत पुरूषांच्या भालाफेक प्रकारात रविवारी रात्री भारताच्या निरज चोप्राने सुवर्णपदक मिळविले आहे.
या स्पर्धेत किशोर जेनाने 84.77 मिटरचा भालाफेक करत पाचवे स्थान मिळविले. किशोर जेनाची या क्रीडाप्रकारातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. मुख्यमंत्री पटनाईक यांनी किशोर जेनाच्या कामगिरीचे कौतुक करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.









